*कोकण Express*
*वरवडे विकास सोसायटीवर सोनू सावंत गटाचे वर्चस्व…!*
*चौकात फटाके फोडत केला जल्लोष…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
वरवडे गावच्या सोसायटी निवडणुकीत घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींमध्ये सोनू सावंत गटाने अखेर बाजी मारली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार जाहीर करताना केलेली चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जाहीर निकालांमध्ये सोनू सावंत गटाला सहा तर प्रकाश सावंत गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. मात्र प्रकाश सावंत गटाच्या पद्माकर देसाई यांनी सोनू सावंत गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे सोनू सावंत गटाचे सात उमेदवार विजय होत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.
निवडणुकीत भाजपाचेच प्रकाश सावंत आणि सोनू सावंत यांचे दोन गट एकमेकांसमोर ठाकले होते. एकूण 239 मतदारांनी आजच्या सोसायटी निवडणुकीसाठी मतदान केले. अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानानंतर लागलीच झालेल्या मतमोजणीवेळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक निकाल लागला. प्रकाश सावंत गटाच्या रिक्षा निशाणीवर सुभाष वरवडेकर, प्रकाश सावंत, रमेश बांदल, अशोक घाडी, दीपक घाडी, पद्माकर देसाई, स्नेहलता सावंत हे 7 सदस्य तर सोनू सावंत गटाच्या कपबशी निशाणीवर राजकुमार बोंद्रे, हनुमंत बोंद्रे, रुपाली बोंद्रे, सुरेश सादये, सखाराम सावंत हे 5 सदस्य निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
विजयी उमेदवार जाहीर करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार निहाय मते वाचून दाखवली होती. यात सोनू सावंत गटाच्या इरफान खोत यांना 117 मते मिळाल्याचे वाचून दाखवण्यात आले होते. मात्र निकाल जाहीर करताना 116 मते असलेल्या रमेश बांदल व सुरेश सादये हे दोन उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. निकाल जाहीर करताना असलेल्या गडबडीमध्ये ऐकणाऱ्यांना याचा पुरता उलगडा झाला नाही. मात्र त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. तो ऐकला असता त्यात इरफान खोत यांना 117 मते मिळूनही ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर सोमवारी सोनू सावंत गटाने निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. त्यावेळी त्यांच्याकडील रेकॉर्ड वरही इरफान खोत यांना 117 मते असल्याचे दिसून आले. अखेर त्यांनी इरफान खोत यांना विजयी जाहीर करतानाच 116 मध्ये असलेल्या सुरेश सादये व रमेश बांदल या दोन उमेदवारांमध्ये चिट्ठी टाकून विजयी उमेदवार जाहीर करण्याचे ठरविले. त्यानुसार दोन्ही उमेदवारांना ओरोस येथे बोलविण्यात आले. मात्र श्री. बांदल हे उपस्थित न राहिल्याने एकूण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करत चिठ्ठीद्वारे उमेदवार घोषित करण्यात आला. यात सोनू सावंत गटाचे सुरेश सादये हे विजयी घोषित झाले. यामुळे दोन्ही गटाचे स्वतंत्र चिन्हांवर विजयी झालेले उमेदवार समसमान म्हणजे 6- 6 झाले आहेत. मात्र श्री. देसाई यांनी सोनू सावंत गटाला पाठिंबा दिल्याने सोनू सावंत गटाचे सात तर प्रकाश सावंत गटाचे पाच उमेदवार असे चित्र झाल्याने या सोसायटीवर सोनू सावंत गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.