*कोकण Express*
*वरवडे सोसायटीत भाजपाच्याच दोन गटातील लढतीचा निकाल लागला*
*प्रकाश सावंत गटाच्या पद्माकर देसाई यांनी सोनू सावंत गटाला समर्थन दिल्याने संख्याबळ झाले समसमान..*
*कणकवली :मयुर ठाकूर*
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वरवडे गावात भाजपाचेच दोन गट आमने-सामने वरवडे सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लढत आहेत. आज झालेल्या मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निकालात प्रकाश सावंत गटाकडून सात जागांवर विजय झाल्याचा दावा तर सोनू सावंत गटाकडून सहा जागांवर आपला विजय झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून गावात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वरवडे गावच्या सोसायटी निवडणुकीत भाजपाचेच प्रकाश सावंत आणि सोनू सावंत यांचे दोन गट एकमेकांसमोर ठाकले होते. एकूण २३९ मतदारांनी आजच्या सोसायटी निवडणुकीसाठी मतदान केले. आज अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानानंतर लागलीच झालेल्या मतमोजणीवेळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक निकाल लागला. प्रकाश सावंत गटाच्या रिक्षा निशाणीवर सुभाष वरवडेकर, प्रकाश सावंत, रमेश बांदल, अशोक घाडी, दीपक घाडी, पद्माकर देसाई, स्नेहलता सावंत हे ७ सदस्य निवडून आले. तर सोनू सावंत गटाच्या कपबशी निशाणीवर राजकुमार बोंद्रे, हनुमंत बोंद्रे, रुपाली बोंद्रे, सुरेश सादये, सखाराम सावंत हे ५ सदस्य निवडून आले. चिन्ह निशाणीनुसार प्रकाश सावंत गटाचे ७ तर सोनू सावंत गटाचे ५ सदस्य निवडून आले. यावेळी प्रकाश सावंत गटाच्या कार्यकर्त्यानी फटाके वाजवून जल्लोष केला. मात्र त्यानंतर प्रकाश सावंत गटाच्या रिक्षा निशाणीवर निवडून आलेल्या पद्माकर देसाई यांनी मिडियासमोर येत स्वतःचे समर्थन सोनू सावंत गटाला असल्याचे सांगितल्याने निवडणूक निकालात ट्विस्ट निर्माण झाला आणि सोनू सावंत गटाकडे ६ सदस्य झाल्यामुळे प्रकाश सावंत आणि सोनू सावंत या दोन्ही गटाकडे समसमान बलाबल झाले. पद्माकर देसाई यांनी आपण सोनू सावंत गटासोबत असल्याचे सांगताच सोनू सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाके फोडून विजयी जल्लोष केला. आता पुढील ५ वर्षांसाठी होणाऱ्या चेअरमन,व्हाईस चेअरमन कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

