*कोकण Express*
*जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा कोअर टीम मध्ये होता मनीष दळवी यांचा समावेश*
*उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब*
*केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून हिरवा कंदील*
*कणकवली : मयुर ठाकूर*
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँके वर भाजपाप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनलचे ११ संचालक निवडून येत निर्विवाद बाजी मारल्यानंतर अध्यक्ष पदाकरिता भाजप कडून कोणाचे नाव निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यात अनेक नावे चर्चेत असतानाच अखेर भाजपाकडून अध्यक्ष पदाकरिता या बँकेच्या निवडणुकीच्या कोअर टीम मध्ये असलेले व मतदानाचा हक्क न बजावता देखील बहुमताने विजयी झालेले मनीष दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मनीष दळवी व अतुल काळसेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपच्या गोटातून अध्यक्ष पदासाठी संचालक अतुल काळसेकर, विठ्ठल देसाई, गजानन गावडे ही नावे चर्चेत असताना मनीष दळवी यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. मनीष दळवी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावरच संतोष परब हल्ला प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यानंतर मनीष दळवी हे अज्ञातवासात होते. या सर्व पार्श्वभूमीवर काळसेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र मनीष दळवी यांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अखेर त्यांच्या नावावर अध्यक्ष पदाकरिता भाजपाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.