*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. महादेव नारींगकर उपस्थित होते. आपल्या मनोगतात हिंदी दिनाचे महत्त्व विशद करून हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेले प्रयत्न त्यांनी सांगितले. त्यामुळे आज हिंदी फक्त भारतातच नाही तर सगळ्या जगात प्रसिद्ध झाली. मूळ संस्कृत भाषेतून हिंदी भाषेचा जन्म झाला. त्यानंतर मात्र या भाषेने आपला प्रचार आणि प्रसार केला. आणि जनमानसात जागा मिळवली. आज हिंदी भाषेचे साहित्य फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हिंदी भाषा एकतेचे प्रतीक म्हणून आपल्यासमोर असते. असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात हिंदी विभाग प्रमुख तथा प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रायबोले यांनी हिंदी भाषा सर्वश्रुत होत असताना त्यात प्रेमाचा भाग आहे. कारण भारत असा एक देश आहे की ज्याने कोणत्या देशावर स्वतः आक्रमण केलेले नाही. त्यामुळे आपल्या कोणत्याही गोष्टी लादल्या नाहीत. भाषा ही तशीच आहे हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला तो प्रेमभावनेने झालेला आहे. आज हिंदी खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यात असणारी शेरोशायरी तर खूप प्रसिद्ध आहे. हिंदी साहित्याला खूप मागणी आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळाले त्याचे श्रेय संत कबीर यांना जाते . ही हिंदी भाषेची ताकद आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश राणे यांनी तर आभार प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

