*कोकण Express*
*अनंत पिळणकर यांच्या शिष्टाईनंतर प्रीतम मोर्ये यांचे परिवहन कार्यालया विरोधातील उपोषण मागे*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
परिवहन कार्यालयातील करभरविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मोर्ये यांनी केलेले उपोषण आज राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे घेतले. पिळणकर यांनी मोर्ये यांची भूमिका समजून घेत जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांच्याशी चर्चा केली. यानंतर स्वतः सावंत पिळणकर यांच्यासोबत उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले. यावेळी त्यांनी मोर्ये यांची भूमिका समजावून घेतली आणि संबंधित यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान यानंतर पिळणकर यांच्या शब्दावर मोर्ये यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, देवगड विधानसभा युवकचे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, रविभूषण लाड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग मध्ये काही अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक लोकांची कामे करताना टाळाटाळ करतात व त्यांना कार्यालयाचे हेलफाटे मारायला लावतात. जेणेकरून सदर व्यक्ती एजंटांकडे जाईल. सदर एजंट आणि अधिकारी यांचे लागेबांधे असून लोकांना लुटण्याचे काम केले जात आहे. थेट येणाऱ्या व्यक्तींचे काम केले जात नाही. त्याला ताटकळत ठेवले जाते. रिक्षा स्क्रॅब करण्यासाठी जाणीवपूर्वक गाड्या ओरोस येथे आणायला लावल्या जातात.तसेच नजीकच्या भंगरवल्याला गाड्या तोडायचे काम दिले जाते. कार्यालयातील अरुण महादेव फोंडेकर हे कर्मचारी नाहक त्रास देतात. अशा विविध प्रश्नांवर प्रीतम मोर्ये यांनी उपोषण केले होते.
याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी प्रीतम मोर्ये आणि त्यांच्या उपोषणकर्त्या सहकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर पिळणकर यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांची भेट घेतली. त्यांच्या दालनात चर्चा केली आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या आणि वस्तुस्थिती यावर चर्चा केली. यानंतर राजेंद्र सावंत यांनी पिळणकर यांच्यासोबत उपोषणकर्त्यांच्या भेट घेतली. यावेळी उपस्थित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. राजेंद्र सावंत यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सावंत यांची विनंती आणि पिळणकर यांची शिष्टाईनंतर उपोषणकर्त्यांच्या आपले उपोषण मागे घेतले आहे.