*कोकण Express*
*शालेय स्पर्धा न झाल्याने खेळाडू हवालदिल, खेळाडूंना ग्रेसगुण देण्याची मागणी*
*कला विषयाच्या आॅनलाईन परिक्षा , मग क्रिडा बाबत उदासिनता का?*
*कासार्डे ः संजय भोसले*
कोवीड 19 प्रादुर्भावाने गेल्या दोन वर्षात शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या नाही. ग्रेसगुण मिळण्यासाठी दहावी बारावीत असताना सहभागाची अट शासनाने शासन निर्णयात घातलेली असल्याने या वर्षीही स्पर्धा न झाल्याने खेळाडू ग्रेस गुणांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शासनाने मागील वर्षी प्रमाणे ग्रेस गुणांसाठीची सहभागाची अट शिथील करावी अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक दतात्रय मारकड, जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, राज्य सचिव दिनेश म्हाडगूत यांनी दिली.
एकविध खेळ संघटनांच्या काही खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. शासन निर्बंधामुळे काही स्पर्धा निवड चाचणी पद्धतीने पार पडल्या. त्यामुळे खेळाडूंनी सहभाग घेऊनही अनेकांना सहभागाची प्रमाणपत्र मिळालेले नाहीत. सद्यस्थितीत राज्यातील रुग्ण संख्या विचारात घेता अनेक स्पर्धा स्थगित अथवा रद्द कराव्या लागल्या असून, आगामी काळात स्पर्धा होणे अशक्य आहे. चित्रकला स्पर्धेत कधीही उत्तीर्ण असेल तर दहावी बारावीत गुण दिले जातात. त्याच प्रमाणे शासनाने दहावी बारावीत असताना स्पर्धेतील सहभागाची अट रद्द करून सहावी ते बारावी दरम्यान कधीही खेळला असेल तरी मागील प्राविण्याच्या आधारावर विशेष बाब म्हणून सवलत देण्यात यावी अशी मागणी शासनास निवेदनाद्वारे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, उपाध्यक्ष आनंद पवार, राजेंद्र पवार, राजेश जाधव, विलास घोगरे, राजेंद्र कदम, प्रितम टेकाडे, उमेश बेल्लाळे, कैलास माने, मच्छींद्र ओव्हाळ,
यांनी केली आहे.
*कलेच्या ऑनलाईन परीक्षा, मग क्रीडा बाबतच दुजाभाव का ?*
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या चित्रकला परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात या संबंधी निर्देश उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ दिले. मात्र क्रीडा स्पर्धा, ग्रेस गुण या बाबत क्रीडा मंत्री उदासिन का? क्रीडा मंत्र्यांनी याबाबत त्वरित ठोस धोरण निश्चित करुन खेळाडूंना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.