*कोकण Express*
*आरोंदा येथे ३७ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या…*
*सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद; मानसिक नैराश्येतून प्रकार…*
आरोंदा येथील ३७ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. वसंत बाबुराव मोटे (रा.मानसीवाडी), असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान याबाबतची खबर त्याचा भाऊ जगन्नाथ बाबुराव मोटे यांनी सावंतवाडी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मानसिक नैराश्येतून त्याने हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तरुण हा पुणे येथे कामाला होता. महिन्याभरापूर्वी तो काम सोडून आरोंदा येथील आपल्या घरी आला होता. दरम्यान काल रात्री आपल्या नातेवाईकांसोबत जेवण झाल्यानंतर तो आपल्या बेडरूम मध्ये झोपायला गेला. मात्र रात्री उशीरा घरातल्या व्यक्तींची नजर चुकवून घराशेजारी असलेल्या भेंडीच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास बांधुन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी सात वाजता घरातील व्यक्तींच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची खबर सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.