*कोकण Express*
*वेंगुर्ल्यात भरारी पथकाकडून प्लास्टिक जप्त*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला शहरात प्लास्टिक जप्तीच्या भरारी पथकाने ७ जानेवारी रोजी धडक कारवाई करताना सुमारे १५० आस्थापनांकडून अंदाजे ९० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात यापूर्वीच प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे. वेंगुर्ला नगरपरिषद शेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक साठवणूक व वापर करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच शहरातील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यांच्यासह सर्वांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करुन नये व कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. त्या अनुषंगाने ७ जानेवारी रोजी शहरातील मुख्य व्यापारी क्षेत्र बाजारपेठ येथे नगरपरिषदेच्या भरारी पथकाने प्लास्टिक जप्ती व जनजागृतीची धडक कारवाई केली. या जप्तीमध्ये सुमारे १५० आस्थापनांकडून अंदाजे ९० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्लास्टिकमुक्त वेंगुर्ल्याचे ध्येय समोर ठेवून शहरात अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरिता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याअन्वये संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी दिली.