*कोकण Express*
*पोलीस हवालदर बावधाने व वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांची तत्परता*
*पादचाऱ्याला ठोकून पळ काढणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाला अटक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील बेळणे येथे महामार्गावर पादचाऱ्याला ठोकर देऊन पळून जाणाऱ्या स्कारपीओ चालकाला कणकवली पोलीस ठाण्यातील हवालदर मंगेश बावधाने व वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांनी प्रसंगावधान दाखवून शिताफीने पकडले. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास एम. एच. ०६ बीई ३७७२ स्कारपीओ गाडी ही भरधाव वेगाने जालना येथून मालवणच्या दिशेने जात असताना बेळणे येथे एका व्यक्तीला ठोकर दिली. हा अपघात एवढा भयानक होता की ठोकलेली व्यक्ती जागीच बेशुद्ध पडली. ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. अजित अनजी सकपाळ रा. बेळणे असे जखमीचे नाव आहे. तर अपघात करणारा चालकाचे नाव गोपाळ जाधव असे असून तो जालना येथील आहे.
अपघात करणारा स्कारपीओ चालक त्या ठिकाणी न थांबता पळून गेला. याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस हवालदार बावधाने यांना दिली. मग बावधाने हे गडनदीवर या गाडीला रोखण्यासाठी थांबले तर वाहतूक पोलीस नाईक माने हे जाणवली नदीवरील पुलावर थांबले. भरधाव वेगाने येणाऱ्या बलोरो चालकाला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला असल्याचे लक्षात येताच आणखीनच सुसाट वेगाने तो गोव्याकडे पळाला. कणकवलीत दोन्ही ठिकाणी हा पोलिसांनी प्रयत्न करूनसुद्धा थांबला नाही. याची खबर ओसरगाव टोल नाका येथील वाहतूक पोलिसांनी देऊन त्याठिकाणी बॅरिकेट टाकून अखेर ही गाडी आडविली आणि ताब्यात घेण्यात आली. गुन्हा करून पळत असताना या गाडीला आणि त्याच्या चालकाला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यासाठी पोलीस हवालदर बावधाने व कर्तव्यदक्ष पोलीस चंद्रकांत माने यांनी दाखविलेली तत्परता महत्वाची ठरली आहे. हवालदार बावधाने आणि वाहतूक पोलीस चंद्रकांतमाने यांचे या कामाबद्दल अभिनंदन केले जात आहे


