*कोकण Express*
*राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्रत लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध आणखीन कठोर*
*मुंबई,ता.०५:*
कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कठोर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबत नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. दरम्यान आज उशीरा रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. तर मंत्रालयातील बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार असून मुख्यमंत्री कोणत्या निर्बंधांना हिरवा कंदील दाखवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. अशातच राज्यातील निर्बंध कसे असू शकतात, यासंदर्भातील काही निर्बंधाची माहिती प्रसारमाध्यमांच्या हाती लागली आहे.
त्यानुसार फॅन्सी मास्क वापरण्याच्या संदर्भात निर्बंध येण्याची शक्यता आहे. तसेच सौम्स लक्षणं असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात यावे, ज्यांना गंभीर लक्षण आहेत त्यांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्यात यावा, तसेच रुग्णांची कॉन्टक्ट ट्रेस पासिंग जलद गतीने करण्यात यावी, यांसारखे निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

