मच्छीमार जगले पाहिजे हीच शासनाची भूमिका असली पाहिजे!

मच्छीमार जगले पाहिजे हीच शासनाची भूमिका असली पाहिजे!

*कोकण  Express*

*मच्छीमार जगले पाहिजे हीच शासनाची भूमिका असली पाहिजे!*

*शिरोडा येथील मिनी पर्ससीन मच्छीमारांची भूमिका*

*मालवण येथील पर्ससीन मच्छीमारांच्या उपोषणाला पाठींबा*

*मालवण ः प्रतिनिधी*

शिरोडा येथील मच्छीमारांनी मालवण येथील पर्ससीन मच्छीमारांच्या साखळी उपोषण स्थळी उपस्थिती दर्शवत पाठींबा दिला. सर्व प्रकारचे मच्छीमार जगले पाहिजे. हीच भूमिका शासनाची असली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने जाचक अटींसह केलेला नवीन मच्छीमार कायदा मागे घ्यावा. अशी भूमिका शिरोडा येथील मच्छीमार बाबा नाईक यांनी स्पष्टपणे मांडली.

सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने नवीन सुधारित मच्छीमार कायद्यातील जाचक अटीं विरोधात मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग समोर सिंधुदुर्गातील पर्ससीन धारक मच्छीमारांनी शनिवार १ जानेवारी साखळी उपोषण छेडले आहे. मंगळवार चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

शिरोडा येथील मिनी पर्ससीन मच्छीमार बांधवांनी पर्ससीन आंदोलनाला पाठिंबा देत भूमिका स्पष्ट केली. शिरोड्याला लागून गोवा प्रांत आहे. गोव्याचे ट्रॉलर सिंधुदुर्ग महाराष्ट्र सागरी हद्दीत करत असलेली मासेमारी शासनाला चालते. मात्र स्थानिकांना मासेमारीस निर्बंध घालणे हा कुठला न्याय ? राज्यकर्त्यांनी याचा बोध घ्यावा. सर्व मच्छीमार जगले पाहिजे हीच भूमिका राज्यकर्ते यांची असली पाहिजे. असेही बाबा नाईक यांनी भूमिका मांडताना सांगितले.

मासेमारी प्रकारातील एका बोटींवर १५ ते २० कुटुंब जगत असतात. त्या कुटुंबाची उपासमार शासनाला चालेल का ? तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा. नवा कायदा शासनाने मागे घ्यावा. अशी मागणीही बाबा नाईक व उपस्थित मच्छीमारांनी केली आहे.

पर्ससीन आंदोलन सर्वच ठिकाणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यतील पर्ससीन मच्छीमार बांधवांनी १ जानेवारी पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणास सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. रत्नागिरी- साखरीनाटे व अन्य ठिकाणीही पर्ससीन उपोषण सुरू झाले आहे. अन्य किनारपट्टी भागातही उपोषण सुरू होईल. आमच्या मागण्या निश्चितच मान्य होतील असा विश्वास पर्ससीन मच्छीमारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!