*कोकण Express*
*कणकवली बसस्थानकात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने…*
*पगार वेळेवर देण्याचीमागणी :आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तीन महिन्याचे वेतन थकल्याने एस.टी.कर्मचार्यांवर आत्महत्येची वेळ आली. एका दिवसांत दोन कर्मचार्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आज कणकवली एस.टी.बस स्थानकात निदर्शने केली. तसेच राज्यातील आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर एस.टी.कर्मचार्यांना पगार वेळेवर मिळावेत या मागणीचे निवेदन एस.टी.अधिकार्यांना सादर करण्यात आले.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, सरचिटणीस महेश गुरव, युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, संतोष पूजारे, आशिये सरपंच संतोष जाधव, ठाकूर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी आज कणकवली बसस्थानकात एकत्र आले. त्यानंतर ‘कामगार विरोधातील ठाकरे सरकारचा निषेध असो‘, ‘एस.टी.कर्मचार्यांना थकीत वेतन मिळालेच पाहिजे’ आदी घोषणा देण्यात आल्या. एस.टी. बस ही ग्रामीण भागाची जीवन वाहिनी आहे. मात्र ही बससेवा अहोरात्र सुरू ठेवणार्या कामगारांवर वेतन मिळाले नसल्याने उपाशी मरण्याची वेळ आली आहे. एस.टी.कर्मचारी आत्महत्येकडे वळत आहेत ही बाब दुदैवी आहे. सर्व एस.टी.कर्मचार्यांना तीन महिन्याचे थकीत वेतन तसेच यापुढील वेतन देखील दरमहा मिळायलाच हवे अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मांडली. राज्य सरकार विरोधातील घोषणाबाजी आणि निदर्शने झाल्यानंतर थकीत वेतन वेळेवर मिळण्याबाबतचे निवेदन एस.टी.अधिकार्यांना सादर करण्यात आले.