*कोकण Express*
*साक्षात बाळासाहेब ठाकरेच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतात तेव्हा…!*
*नेमकं असं काय घडलं होतं..?*
तारीख होती 19 जुलै 1992.. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रावरील ‘हेडलाईन’ पाहून अवघा महाराष्ट्र हादरला.. हेडलाईन होती, ‘अखेरचा जय महाराष्ट्र..!’ साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली..! शिवसैनिकांच्या काळजाचा ठोका चूकला.. रक्ताचे पाणी करुन, ज्यांनी शिवसेना निर्माण केली, घडवली, वाढवली.. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, ते बाळासाहेब ठाकरेच ‘शिवसेना सोडतो’ असे म्हणत होते..
बरं असं एकदा नव्हे, तर दोन वेळा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. नेमकं असं काय झालं होतं, की इतका कठोर, टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत बाळासाहेब ठाकरे आले होते..? याबाबत जाणून घेऊ या..!
नेमकं काय घडलं..?
मुंबईतील मराठी माणसासाठी, त्याच्या भल्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी ‘शिवसेना’ या संघटनेचे बीज लावले.. हळुहळू संघटनेशी कार्यकर्ते जुळत गेले, तसे संघटनेचे रुपांतर माेठ्या वटवृक्षात झाले. सुरुवातीला बळवंत मंत्री, माधव देशपांडे, श्याम देशमुख व नंतर मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे खंदे कार्यकर्ते शिवसेनेला मिळाले.. अनेक कार्यकर्ते शिवसेनेत काम करीत असले, तरी बाळासाहेब ठाकरे हेच संघटनेचे अनभिषिक्त सम्राट होते. अर्थात दबक्या आवाजात बाळासाहेब ठाकरे यांच्याविराेधात चर्चा होत असली, तरी उघड उघड बाेलायची कोणाची हिंमत नव्हती..!
शिवसेनेत 1985 नंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पुढची पिढी सक्रिय झाली. बोलण्याची तीच पद्धत, तेच हावभाव.. यामुळे राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची झलक पाहायला मिळत असल्याचे तेव्हाही बोलले जात होते. त्यातूनच 1988 साली भारतीय विद्यार्थी सेनेच्या प्रमुखपदी राज ठाकरे यांची निवड झाली.. नि खरी ठिणगी पडली..!
शिवसेनेतील जून्या कार्यकर्त्यांमध्ये चुळबूळ वाढली. आतापर्यंत गड-किल्ले नि फोटोग्राफीत व्यस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांचाही पक्षातील वावर वाढला.. 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पदरी मोठे अपयश आले. नंतर 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नि त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत, आतापर्यंत शांत असलेल्या पक्षातील असंतुष्ट नेत्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात उघड उघड बोलायला सुरुवात केली. त्यात आघाडीवर होते, माधव देशपांडे..!
“आयुष्यभर घराणेशाहीविरुद्ध लढलो नि त्याच शिवसेनेत घराणेशाही आणली जात आहे. पूत्र नि पुतण्याच्या नादी लागून बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचा नाश करीत आहेत..” असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हेही नाराज झाले नि त्यांनी तडकाफडकी थेट शिवसेनाच सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ‘सामना’मध्ये हेडलाईन आली, ‘अखेरचा जय महाराष्ट्र’..!
19 जुलै 1992 च्या ‘सामना’च्या अग्रलेखात बाळासाहेब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना नि शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे..! शिवसैनिक हेलावले. भर पावसात ‘शिवसेना भवन’समोर शिवसैनिक जमा झाले. अखेर शिवसैनिकांच्या प्रेमापुढे बाळासाहेब ठाकरे यांनी नमते घेतले. आपला निर्णय मागे घेतला.. नंतर पक्षातील विरोधकही शांत झाले..
दुसरा किस्सा
महाराष्ट्रात 1978 साली झालेल्या निवडणुकांत शिवसेनेचा मोठा पराभव झाला. त्यानंतर लगेच मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागल्या. विधानसभेला झालेला पराभव बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला जर यश मिळाले नाही, तर शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देईन, अशी भीष्मप्रतिज्ञा बाळासाहेब ठाकरे यांनी केली.
1973 मध्ये मुंबई महापालिकेत 40 नगरसेवक असणाऱ्या शिवसेनेचे 1978 मध्ये फक्त 21 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे दु:खी झाले. शिवाजी पार्कवर झालेल्या सभेच्या वेळी ते म्हणाले, की मी शब्दाला जागणारा माणूस आहे. जाहीर केल्याप्रमाणे मी शिवसेना पक्षाचा राजीनामा देतो, पण शिवसैनिक आपल्या विठ्ठलाला सोडायला तयार नव्हते. अखेर बाळासाहेब ठाकरे यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला..
(ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी आपल्या ‘जय महाराष्ट्र’ पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.)