कनेडी आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे

*कोकण Express*

*कनेडी आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे…*

*शिवसेना कार्यकर्त्यांचे बांधकाम समोर उपोषण : ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तालुक्यातील कनेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. काम अर्धवट झाले असतानाही ठेकेदाराला सहा लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच कामाची मुदत संपली तरी ठेकेदाराने आरोग्य केंद्राचे काम पूर्ण केलेले नाही.या प्रकरणी ठेकेदाराला काळ्या यादीत टाका या मागणीसाठी आज शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी येथील पं.स.च्या बांधकाम कार्यालयासमोर उपोषण केले.
या उपोषणामध्ये पंचायत समितीचे सदस्य मंगेश सावंत यांच्यासह शेखर सावंत, काँग्रेसचे कार्यकर्ते महेंद्र सावंत, भिरवंडे सोसायटीचे चेअरमन बेनी डिसोझा, सुदर्शन सावंत, मंगेश बोभाटे, मिलिंद बोभाटे, संतोष सावंत आदी सहभागी झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागेश मोरये, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, संदेश सावंत, राजू राणे, राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर यांनीही उपोषणस्थळी जाऊन सहभाग घेतला होता.
पं.स.सदस्य मंगेश सावंत म्हणाले, कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायचे होते. पण ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. त्याचा मोठा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. कोरोना काळात तर कोविड सेंटर आणि इतर सुविधांच्या निर्मिती करण्यासाठी आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता होता.
ते म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट होत असल्याची बाब आम्ही सहा महिन्यापूर्वी बांधकामचे अभियंता श्री.सुतार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी त्यांनी ठेकेदाराला सूचना दिल्या जातील अशी माहिती दिली. त्यानंतर आत्ताही काम अपूर्ण असल्याबाबत श्री.सुतार यांचे लक्ष वेधले. मात्र आत्ताही श्री.सुतार हे ठेकेदाराला सूचना देऊ असेच सांगत आहेत. मात्र ठेकेदारावर काय कारवाई करणार याबाबत ते काहीही सांगत नाहीत. आम्ही ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. ती मान्य झाली तरच उपोषण मागे घेणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!