*कोकण Express*
*धनगर समाजाला नाहक त्रास देणाऱ्यांना प्रशासनाने अद्दल घडवावी ; प्रदेश अध्यक्ष-प्रविण काकडे*
*ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे उपजिल्हाधिका-याबरोबर चर्चा व निवेदन!*
*कासार्डे ः संजय भोसले*
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले आहेत,तरीही धनगर समाजाला रस्ता, पाणी,शाळा,घरे व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे.भोळ्या भाबड्या समाजाला मुलभुत सुविधांपासून वंचित ठेवणा-यांची प्रशासनाने दखल घेऊन समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सिंधुदुर्ग उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा शिंगन यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
सोमवारी संपूर्ण दिवस प्रविण काकडे सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर होते. दरम्यान त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजावर काही लोक जाणिवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार करीत असल्याचे उपजिल्हाधिकारी श्रीम.वर्षा शिंगन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,व मालवणचे बीडीओ श्री.जाधव यांनाही निवेदन देत लक्ष वेधले
या प्रसंगी त्यांनी अधिकारी वर्गासमोर अनेक समस्यांचा पाढा वाचला. सध्या धनगर वाड्या वस्तीवर असलेल्या शाळादेखील पटसंख्या कमी असल्याने बंद करण्यात येत आहेत, त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना मैलोनमैल सुमारे १०/१२किलोमीटर पायपीट करत शाळेत जावे लागत आहे. समाज बांधव राहत असलेल्या वाडी वस्तीवर आजही रस्ते नसल्यामुळे लोकांना दवाखान्यात अथवा आरोग्य सेवाही उपलब्ध होत नाहीत. मालवण तालुक्यातील सर्व धनगरवाडी वस्तीवर रस्ते होणे आवश्यक आहेत.अशी मागणी वर्षा शिंगण उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याप्रसंगी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमोल जंगले, मालवण तालुकाध्यक्ष मंगेश झोरे, सुनिल वरक, संजय शिंगाडे,अर्जुन चव्हाण व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धनगरवाड्या वस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.