भाजपावर टीका करणे हीच विकास कुडाळकरना शिवसेनेने दिलेली रोजंदारी

*कोकण Express*

*भाजपावर टीका करणे हीच विकास कुडाळकरना शिवसेनेने दिलेली रोजंदारी!*

*सरपंच तथा भाजपा गट प्रमुख श्री. उमेश धुरी*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

काल भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर पत्रकबाजी करत खालच्या पातळीवरील टीका करणाऱ्या शिवसेनेचे नेते विकास कुडाळकर यांना सरपंच तथा भाजपा गट प्रमुख श्री. उमेश धुरी यांनी चांगलेच धुतले आहे. नागवेपणाची भाषा राजकारणात वापरणाऱ्या कुडाळकरांची वेळ आली की आम्ही जरूर इच्छापूर्ती करु. जनतेसमोर यांचे खोटे बुरखे फाडुन वास्तव उघड करू. यांच्या राजकीय नागवेपणाची हौस भागवायला आम्हाला वेळ लागणार नाही. राजकीय रोजंदारीपायी सेनेची हमाली करत भाजपावर आणि पार्टीच्या नेत्यांवर नाहक टीका करण्याचे थांबवणेच विकास कुडाळकरांच्या हिताचे राहील. झाकली मूठ सव्वा लाखाची राहू द्या. गेल्या घरी निवांत रहा आणि सुखाने नांदा असा सल्ला उमेश धुरी यांनी दिला आहे.

विकास कुडाळकर आणि शिवसेना या दोघात एक साम्य मात्र नक्कीच आहे, की दोघांच्यातही निव्वळ नावाचाच विकास आहे. सत्तेत असूनही जनतेची कसलीच कामे होत नाहीत त्यामुळे जनता त्रस्त आहे, एक प्रकल्प कोकणात आणण्याची यांची धमक नाही, त्यामुळे बेरोजगार युवावर्ग अस्वस्थ आहे, महिला वर्गाला सुरक्षिततेची हमी नाही, कसलीही विकासाची दृष्टी या नव्या शिवसेनेला उर्फ उध्दवसेनेला नाही. सुड आणि द्वेषाचे राजकारण यामुळे राज्यात आज आणीबाणीसारखी अवस्था करून राज्य टिकवण्याची धडपड चाललेली दिसत आहे. कायद्याचे ज्ञान नव्या शिवसेना नेत्यांना नाही आणि बोलायचे काय नि कसे याची अक्कल नव्याने त्यांच्या पक्षात गेलेल्यांना नाही. सत्ता असूनही कोकणातील जनतेच्या फायद्याच्या एकाही मुद्द्यावर चर्चा करण्याची ताकद आजच्या शिवसेनेत उरलेली नाही. रस्ते जीवघेणे झाले आहेत, बस स्टँडसारख्या इमारती यांच्या निकम्म्या नियोजनामुळे जीवघेण्या आणि कचकड्याच्या बनल्या आहेत, आरोग्य यंत्रणा कमकुवत झाल्या आहेत. राणे साहेबांमुळे मंजूर झालेले व पूर्णत्वाला आलेले कुडाळचे महिला हॉस्पिटल तरी पुढे चालू करण्याची ताकद तुम्ही दाखवावी, फक्त फालतू स्टेटमेंटबाजीत विकास कुडाळकरांसारखे सरसकट सगळेच शिवसेना नेते रमलेले आहेत. ही सत्ता आपली नाहीच याची खात्री बहुधा त्यांना झालेली दिसते.

तिथे यांचे मुख्यमंत्री घरात बसून बिनबुडाचा कारभार करताहेत आणि खाली हे कुडाळकरांसारखे लोक घरात बसून विरोधी पक्षावर बिनबुडाची टीका करत आहेत. विरोधात असूनही आम्ही संयम पाळून बोलत आहोत. पक्षाची रोजंदारी करत पदाची

जर आम्ही संयम सोडला तर पळता भुई थोडी होईल. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींवर टीका करण्यापेक्षा आधी ज्या पक्षात गेलात त्या पक्षाच्या नेतृत्वावर बोलण्याचे धाडस दाखवा. व्यक्तिगत टीका करणे आमच्या तत्वात बसत नाही, पण तुम्ही कौटुंबिक विषयापर्यंत घसरलात म्हणून बोलावे लागते की वेंगुर्ल्यात ज्या संजय पडतेंनी तुमच्या कानाखाली चार वाजवल्या त्याच पडतेच्या नेतृत्वाखाली पुन्हा काम करायची पाळी तुमच्यावर आज आली आहे. त्या आवाजांचे साक्षीदार आजही भाजपात आहेत हे विसरू नये. आज तुम्ही जी भाजपावर वारंवार टीका करत आहात, त्यामागे पुन्हा एकदा त्या आवाजांची भीती तर नाही ना? असेल तर मित्रत्वाच्या नात्याने आजही सांगा, आम्ही तुमची कधीही मदत करू. पण भीती आणि अगतिकतेपायी भाजपा आणि आमच्या नेत्यांवर नाहक टीका करण्याची रोजंदारी स्वीकारू नका, असा प्रेमाचा सल्ला तुम्हाला देत आहोत.

“नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट’ ही भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. त्यामुळे पार्टीसाठी जर काही व्यक्तिगत मतभेद, हेवेदावे असतील तर ते विसरून आम्ही सर्वजण पुढे एकत्रित वाटचाल करतो. आमचे वाद मिटवून निकोप वातावरणात जगण्याची प्रगल्भता आमच्याकडे आहे, ज्याची कल्पना तुमच्या बुद्धीला आकलन होणे कठीण आहे. तेव्हा, रोजंदारी निभावण्यासाठी भाजपात कुठे बोट घालायला जागा मिळते का हे पाहात बसण्यापेक्षा कुडाळकरांनी काही चांगले करता येते का ते पाहावे. कोणी किती पक्ष बदलले आणि का बदलले याचा अभ्यास करायला तुमच्याकडे कालही पुरेसा रिकामा वेळ होता आणि भविष्यातही भरपूर रिकामा वेळ असणार आहे. ज्या राजन तेलींवर तुम्ही टीका करता आहात, त्यांनी प्रत्येक निवडणुकीत अधिकाधिक संघर्ष करत दरवेळी वाढती मते मिळतच पुढे प्रवास केला आहे आणि ही वाढ पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जीवावर नक्कीच आज ना उद्या विजयात परावर्तित होईल. विकास कुडाळकरांनी त्यांची काळजी अजिबात करू नये, पण स्वतःच्या पिंगुळीत आपली जी दिवसेंदिवस पडझड वाढत चालली आहे, त्याचा विचार करण्यासाठीच संजय पडते आणि शिवसेना नेत्यांच्या चरणावर वाहिलेला आपला “अंतरात्मा” वापरावा. स्वतःबरोबर पिंगुळीतुन जनता का आली नाही याचा विचार नक्की करावा. बाकी आम्ही जास्त व्यक्तिगत खोलात तूर्तास जाणे टाळतो, निदान त्यामुळे तरी कुडाळकर आणि पार्टीचा जीव भांड्यात पडेल आणि त्यांना न समजत असलेला “अंतरात्मा” सुटकेचा निश्वास सोडेल.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना तुम्ही निर्दयी म्हणता. पण ते निर्दयी नव्हे, तर पक्षवाढीबाबत कठोर नक्कीच आहेत. भाजपाच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते कठोरपणे करावेच लागते. त्या कठोरपणामुळेच विकास कुडाळकर, सतीश सावंत, संजय पडते अशा जनतेच्या नजरेतून कधीच हद्दपार झालेल्या चिल्लरचाल्लर लोकांना घरी बसणे भाग पडले आहे. निर्दयी कोण आहेत ते तुम्हाला लवकरच कळेल, अजून तुम्ही नव्या पक्षातली नवी नवी सून आहात. तुमच्यावर व्यक्तिगत पातळीवर बोलण्याएवढी तुमची दखल घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही, पण पार्टी म्हणून जर कोणी कटकारस्थानातुन भाजपाला त्रास देणार असतील, तर त्यांची इच्छापूर्ती करत जनतेसमोर त्यांचे बुरखे फाडून नागवे करायला मला वेळ लागणार नाही. उगाच काचेचं घर आणि दिवे लावून कपडे बदलणे वगैरे अतिशय खालच्या दर्जाची पत्रकबाजी करणाऱ्यांनी राजकारण म्हणजे चंद्रकांत काकोडकर किंवा बाबा कदमांची गुलाबी कादंबरी नाही हे समजून घ्यावे, आणि राजकीय पातळी व आपली पायरी सांभाळावी हेच त्यांच्या हिताचे राहील असा सल्ला सरपंच तथा भाजपा गट प्रमुख श्री. उमेश धुरी यांनी दीला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!