*कोकण Express*
*मिस इंडिया स्पर्धेत सिंधुदुर्गच्या सायली सावंतची भरारी*
*द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक विजेतेपदाचा पटकावला मान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गुरुग्राम येथे पार पडलेल्या मिस डायडेम इंडिया २०२१ च्या मिस इंडिया या स्पर्धेत सिंधुदुर्गचा नावाचा ठसा उमटला असून सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावची सुकन्या कु.सायली नारायण सावंत तिने द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक हे विजेतेपद पटकावले आहे सिंधुदुर्गची कन्या तसेच मुंबई -बोरिवली गोराई येथे राहणारी कोकणचा मान उंचवणारी कु. सायली नारायण सांवत हिने आपल्या यशाने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सायलीचे मूळ शालेय शिक्षण हे गोराई, बोरिवली येथील सेंट रॉक्स हायस्कूल मधून झाले आहे.विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाची ती माजी विद्यार्थिनी असून सानपाडा- नवी मुंबई येथील एटीडीसी या फॅशन डीजाईनिंग संस्थेमधून तिने पदवी प्राप्त केली आहे आणि इथूनच तिला पुढे या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले गेले. एटीडीसीमधील शिक्षक आणि कुटुंब यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी इथे पोहचू शकले असे सांगून सायलीने आभार व्यक्त केले आहेत. सायली ही कुडाळ तालुक्यातील पोखरण येथील असून तिचे आई वडिलांसोबत गावी येणे जाणे असते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सायलीने हा उच्च पातळीवरील सन्मान मिळवल्याने तिचे अभिनंदन केले जात आहे. गुरुग्राम येथे पार पडलेल्या मिस डायडेम इंडिया २०२१ च्या मिस इंडिया या स्पर्धेत देशातील 30 टॉप स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये महाराष्ट्रातून सायली सह केवळ तीन स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत कु.सायली नारायण सावंत तिने द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक हे विजेतेपद पटकावले आहे.सायली सावंतला फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे असून नाटक आणि मॉडेलिंग ही तिची आवड आहे. यापूर्वी मिस मुंबईमध्ये टॉप टेनमध्ये सायलीने क्रमांक मिळविला होता तर मिस महाराष्ट्रमध्ये ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. सायलीला राज्य पातळीवर किताब मिळाला नसला तरी तिने देश पातळीवर किताब पटकावत अभिमानास्पद यश संपादन केले आहे सायली सावंत हीच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.