*कोकण Express*
*फसवणूक झालेला ग्राहक भारतात कुठेही तक्रार देऊन हक्क मिळवू शकतो…*
*तहसीलदार रामदास झळके यांचे प्रतिपादन…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
ग्रामीण भागात ग्राहक दिनाची जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे. ऑनलाइन शॉपिंग चे अधिकार कायद्याने ग्राहकांना दिलेले आहेत. फसवणूक झाल्यास ग्राहक भारतात कोठेही तक्रार देऊ शकतो. व आपले हक्क मिळवू शकतो असे प्रतिपादन तहसीलदार रामदास झळके यांनी व्यक्त केले. येथील तहसील कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा वैभववाडी यांच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार अशोक नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा वैभववाडी अध्यक्ष शंकर स्वामी, ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तेजस साळुंखे, तालुका संघटक एस.पी. परब, मनोज सावंत, संजय लोके, नंदू शिंदे, रामेश्वर दांडगे, संतोष पाटील, तेजस आंबेकर, रवींद्र मोरे, श्री भोये व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहक दिनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व बिंदुमाधव जोशी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी झळके म्हणाले, ऑनलाइन ने मागवलेली वस्तू तुम्हाला परत करण्याचा अधिकार आहे. त्याबाबत पाठपुरावा केल्यास त्याचा परतावा आपल्याला मिळू शकतो. या कार्यक्रमाला अधिका-यांची उपस्थिती फार महत्त्वाची आहे. यापुढे हा कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये साजरा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या. तेजस साळुंखे म्हणाले, ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, निवडीचा हक्क, माहितीचा हक्क असलाच पाहिजे. खरेदी केलेल्या वस्तूची परिपूर्ण माहिती ग्राहकाने जाणून घेणे हा त्याचा हक्क आहे. कोणी मनमानी करत असेल तर ग्राहक तक्रार करून त्याचा हक्क मिळवू शकतो. गैरफायदा, फसवणुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी हा ग्राहक दिन साजरा केला जातो. सुरज पाटील म्हणाले, कुठेही बसून तुम्ही कॉन्फरन्सद्वारे माहिती देऊ शकता. तसेच तक्रार कुठुनही देण्याचा अधिकार ग्राहकाला आहे.
स्वामी म्हणाले, ग्राहक पंचायत हे न्याय मिळवून देण्याचे साधन आहे. शासकीय यंत्रणेचा या संस्थेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समजूतीने तक्रार निवारण होणे हे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे आहे. असे सांगितले. नगरपंचायतच्या कारभारावर त्यांनी प्रश्न चिन्ह उभे केले. स्वच्छता, पाणी, स्ट्रीट लाईट, व इतर सुविधा नगरपंचायत प्रशासनाने सोडविल्या पाहिजेत असे सांगितले. तसे न झाल्यास ग्राहक व व्यापारी संघटना एकत्र येऊन ते करण्यास भाग पाडले जाईल असे सांगितले. संजय लोके, तेजस साळुंखे, नंदू शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस.पी. परब यांनी मानले.