बहुमताने कचरा ठेकेदाराचे डिपॉझिट जप्तचा ठराव.

बहुमताने कचरा ठेकेदाराचे डिपॉझिट जप्तचा ठराव.

*कोकण  Express*

*बहुमताने कचरा ठेकेदाराचे डिपॉझिट जप्तचा ठराव…!*

*आ.वैभव नाईक यांच्या घराच्या मागील गटारासाठी 50 लाखाच्या प्रस्तावाला मंजूरी…!*

*कणकवली नगरपंचायत सभेत सत्ताधारी व विरोधकांत काही काळ वाद…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायतीच्या कचरा ठेक्याकरीता सावित्रीमाई सेवा संघ धुळे यांच्याकडून निविदा भरण्यात आली. मात्र या निवेदनानुसार करारनामा करण्यास संबंधित ठेकेदाराकडून टाळाटाळ करण्यात आल्याने नगरपंचायतीचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या मुद्द्यावरून या ठेकेदाराची बयाणा रक्कम व अतिरिक्त बयाना रक्कम जप्त करण्यासंदर्भात गुरुवारी झालेल्या नगरपंचायतीच्या बैठकीत हात वर करुन 12 विरुद्ध 2 असा बहुमताने ठराव घेण्यात आला. शिवसेनेच्या दोन सदस्यांनी त्याला विरोध दर्शविला. तर आ. वैभव नाईक यांच्या घराच्या मागील बाजूकडून जाणार्‍या गटार व संरक्षक भिंतीसाठी शासनाकडून 50 लाख मंजूर झाले आहेत, या कामाच्या प्रस्तावाला या सभेत जोरदार चर्चेअंती मंजूरी देण्यात आली. यावेळी सत्ताधार्‍यांनी ना. नारायण राणे यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्याला शासनाचे 25 लाख देण्यास विरोधकांनी विरोध केला होता याची आठवण करून देत जनतेच्या प्रश्नावर आम्ही राजकारण करत नाही असा टोला विरोधकांना लगावला.

कणकवली न.पं. ची सभा गुरुवारी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे व नगरसेवक उपस्थित होते. या सभेत कचरा ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. शिवसेनेच्या कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी व मानसी मुंज या सदस्यांनी बयाना व अतिरिक्त बयाना रक्कम जप्त करण्यास विरोध दर्शवला. मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व राष्ट्रवादीचे अबिद नाईक यांच्यासह सत्ताधारी 12 सदस्यांनी बहुमताने ठराव मंजूर केला. या बैठकीत नगरसेवक कन्हैया पारकर यांनी ठेकेदाराच्या बाजूने युक्तिवाद केला. या ठेकेदाराला गेले आठ महिने वारंवार मुख्याधिकार्‍यांनी पत्रव्यवहार करून देखील करारनामा केला नसल्याने कचर्‍याकरीता न.पं. फंडातील पैसे खर्च करून 84 लाखाचे नुकसान केल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला. तर या नुकसानीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कन्हैया पारकर यांनी केला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यासाठी नगरपंचायत 25 लाख निधी खर्च करते असे सांगत काहीजणांना याचे खूप दुःख होत होते, मात्र तेच आता नगरपंचायतचे 84 लाख नुकसान होऊनही वेगळी भूमिका घेतात असा टोला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक अबीद नाईक यांनी या कचरा ठेकेदाराने कणकवली शहरातील जनतेचे नुकसान केले. त्यामुळे केवळ अतिरिक्त बयाणा रक्कम जप्त करून थांबू नका तर या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका आणि कचरा ठेका घ्यायचा नसतानादेखील निव्वळ दिशाभूल करण्याकरिता 13 टक्के बिलोने निविदा भरून नगरपंचायतीचे नुकसान केल्याबद्दल तेरा टक्के बिलो रक्कम देखील या ठेकेदाराकडून वसूल करा अशी मागणी नाईक यांनी केली.
यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी ठेकेदाराने कचरा टेंडर बिले भरले त्यामुळे नगरपंचायतीचे 22 लाख रुपये वाचल्याने या कचरा ठेकेदाराचा नगरपंचायत बोलावून सत्कार करा अशी मागणी केली. मात्र कणकवली शहरातल्या जनतेचे पर्यायाने नगरपंचायत चे 84 लाखाचे नुकसान करणार्‍या ठेकेदाराचा नगरपंचायत सत्कार करायचा का? असा सवाल नगरसेवक अभिजीत मुसळे यांनी उपस्थित केला. या बैठकीला नगरसेवक कन्हैया पारकर, उर्वी जाधव, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, मेघा गांगण, रवींद्र गायकवाड, संजय कामतेकर, अबीद नाईक, अ‍ॅड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर, मानसी मुंज, सुमेधा अंधारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!