*कोकण Express*
*कळसुली हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात*
*कासार्डे ः संजय भोसले*
कळसुली शिक्षण संघ मुंबईचे, कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स ,कळसुली या प्रशालेत वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. यामध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याशिवाय आदर्श विद्यार्थी, आदर्श शिक्षक अशी विविध पारितोषिके यावेळी देण्यात आली.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस. व्ही. दळवी (अध्यक्ष-कळसुली शिक्षण संघ मुंबई ) यांनी भूषविले तर सुर्यकांत दळवी (कळसुली शिक्षण संघ मुंबई, उपकार्याध्यक्ष), जय दळवी (खजिनदार -कळसुली शिक्षण संघ मुंबई ), के.आर. दळवी (चेअरमन -शालेय समिती) , प्रकाश दळवी (प्राथमिक शिक्षक राज्य संघाचे सदस्य) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय या कार्यक्रम प्रसंगी सौ.साक्षी परब (सरपंच ग्रामपंचायत कळसुली) , नामदेव घाडीगावकर(शालेय समिती सदस्य), तुषार दळवी (शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष) ,मधुकर चव्हाण (माजी तंटा मुक्ती अध्यक्ष) , पांडूरंग सावंत (शिक्षक पालक संघ सदस्य) विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते
प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.व्ही वगरे यांनी प्रास्ताविकात प्रशालेतील विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच विविध दात्यांच्या दातृत्वाचा नामनिर्देश केला व
या कार्यक्रमाचा उदात्त हेतु कथन केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कळसुली शिक्षण संघ, मुंबईचा अभिनव उपक्रम दिनदर्शिका ( सन-2022) प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी देशभक्तिपर गीत लेखन व गायन स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अमर पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार बी.आर.पालव यांना देण्यात आला.तसेच यावर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु.लतिका वारंग हिला देण्यात आला.
त्याचप्रमाणे ग्लोबल फाऊंडेशन, पिंगुळी यांच्याकडून प्राप्त झालेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.
सद्यस्थितीत एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिरवल गावच्या मुलांचे अतोनात हाल होत आहेत. त्यावर उपाय म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी संतोष नानचे आणि त्यांचे सहकारी यांनी मुलांसाठी बस उपलब्ध करून दिली.याबद्दल कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना कु.निनाद तुषार दळवी याने मनोगत व्यक्त केले.
प्रकाश दळवी, के. आर. दळवी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख उपस्थित सूर्यकांत दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
विद्यार्थ्यांनी यश संपादन करा आणि शाळेचे ऋण सदैव स्मरणात ठेवा असा सल्ला दिला.
शेवटी अध्यक्षीय भाषणात एस.व्ही.
दळवी यांनी यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अपार मेहनत घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन करत यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका सौ.चैत्रा चव्हाण यांनी केले. तर आभार ए.जी.सावंत यांनी मानले.

