*कोकण Express*
*भाजपचा शिवसेनेला ‘धक्का’ ; भाजप पुरस्कृत उमेदवार अपर्णा धुरी विजयी*
*देवबाग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा विजय*
*मालवण ः प्रतिनिधी*
देवबाग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवार अपर्णा धुरी यांनी शिवसेना शाखाप्रमुख रमेश कद्रेकर यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे. तालुक्यातील एकमेव अशा या पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी विजयी जल्लोष केला.
दरम्यान, या विजयाचे श्रेय देवबाग गावातील मतदार, ग्रामस्थ तसेच सर्व भाजपा कार्यकर्त्याचे असल्याचे सांगत तालुक्यातील यापुढील सर्व निवडणुकीत भाजपाच्या विजयाची ही नांदी असल्याचा विश्वास तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.
देवबाग ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधील एका जागेसाठी पोटनिवडणुक मंगळवारी पार पडली. भाजपा पुरस्कृत अपर्णा धुरी विरूद्ध शिवसेना शाखाप्रमुख रमेश कद्रेकर यांच्यात थेट लढत झाली. तालुक्यात आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र, बुधवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथे पार पडलेल्या मतमोजणीत शिवसेना उमेदवार रमेश कद्रेकर यांचा पराभव करत अपर्णा धुरी हिने १८१ मते मिळवत विजय संपादन केला. नायब तहसीलदार जी एम कोकरे, अव्वल कारकून वृंदा पाटकर यांच्यासह दोन्ही उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया मालवण तहसील कार्यालय येथे पार पडली.
मतदान झालेल्या एकूण ३५० मतांपैकी अपर्णा धुरी १८१ मते, रमेश कद्रेकर १६२ मते, नोटा ७ अशा प्रकारे मतदान झाले.
अपर्णा धुरी यांच्या विजयानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, देवबाग- वायरी जिल्हा परिषद शक्तीप्रमुख रामा चोपडेकर, अवी सामंत, श्वेतांगी मणचेकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, जॅक्सन लुद्रीक, मोहन कुबल, नादार तुळसकर, विलास बिलये, दाजी कांदळगावकर, तात्या बिलये, मुकेश कांदळगावकर, विजय केळुसकर, यासह अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
देवबाग ग्रामपंचायत येथील अन्य एका सर्वसाधारण जागेतून यापूर्वीच भाजपा पुरस्कृत नितीन बांदेकर हे विजयी झाले आहेत अशी माहिती भाजपाच्या वतीने देण्यात आली.
आगामी विजयाची नांदी : धोंडी चिंदरकर
विकास हा फक्त नारायण राणे साहेबांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे होत असलेल्या सर्व निवडणुकीत भाजपाचा विजय होत आहे. देवबाग ग्रामपंचायत निवडणुकीतही झालेला विजय हा तालुक्यातील आगामी सर्व निवडणुकीतील विजयाची नांदी आहे. हा विजय कार्यकर्त्यांचा व देवबागच्या जनतेचा आहे. त्यासोबतच प्रत्येक निवडणुकीत स्वतः लक्ष घालून कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या भाजपा नेते प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही विजयाची सुरुवात असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी स्पष्ट केले आहे.

