*कोकण Express*
*वेंगुर्ला शहरातील भाजी विक्रेते व दुकानांची बंद होण्याची वेळ सायंकाळी ७ ऐवजी रात्री ९ करावी….*
*वेंगुर्ला शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी डॉ. अमिकुमार सोंडगे यांना निवेदन*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला शहरात मार्केट मधील भाजी विक्रेते व दुकानांची बंद होण्याची वेळ सायंकाळी ७ ऐवजी रात्री ९ अशी करावी, अशा प्रकारचे निवेदन शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी डॉ. अमिकुमार सोंडगे यांना देण्यात आले.
या निवदेनात म्हटले की, कोरोना पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भाजी मंडईमधील भाजी विक्रेते व अन्य लहान सहान दुकाने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून सायंकाळी ७ वाजता बंद करुन सॅनिटायझिंग करण्याचे सुरु आहे.
परंतु दिवाळी सारख्या महत्त्वाचा सण येत असल्यामुळे लोकांना घराबाहेर पडुन वेगवेगळे साहित्य घेण्यासाठी बाजारात ये-जा करावी लागते. यावेळी भाजी विक्रेते बंद व काही दुकाने सुरु असतात. त्यामुळे लोकांना खरेदीसाठी अधिकचा वेळ म्हणजे रात्रौ ९ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे भाजी विक्रेते छोटे मोठे सर्व दुकानदार व किराणा माल व्यावसायिक तसेच सर्व वेंगुर्ला शहरातील लोकांना बाजारात येणे व खरेदी करणे सोयीचे होणार आहे. ही दुकाने सुरु ठेवत असताना आपणाकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याबाबत योग्य त्या सूचना संबंधित भाजी विक्रेते व किरकोळ व्यापारी यांना देऊन योग्य ती काळजी घेण्याच्या अटीवर मार्केटमधील वेळ दिवाळी सणानिमित्त वाढवावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, सचिन वालावलकर, संदीप केळजी, सुहास मेस्त्री, डेलीन डिसोझा, आनंद बटा, सौ. निरावडेकर आदी उपस्थित होते.