*कोकण Express*
*सिडीएस बिपीन रावत यांना पेन्सिल स्केच मधून श्रद्धांजली!*
*युवा कलाकार प्रणय पुजारेची भावनिक कृतज्ञता*
*मालवण ः प्रतिनिधी*
तामिळनाडू मधील कुंनूर येथे नुकत्याच झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशावर या घटनेची शोककळा पसरली असून सर्वत्र जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रणय देवदत्त पुजारे या युवा पेन्सिल स्केच रेखाटणाऱ्या कलाकाराने पेन्सिल स्केच करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘देशाला तुमचा गर्व असल्याची भावना’ त्याने या पेन्सिल स्केचमधून व्यक्त केली आहे.
मुणगे येथील श्री भगवती देवस्थान विश्वस्त व प्रसिद्ध भजनी बुवा, बांधकाम व्यावसाईक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांचा प्रणय हा मुलगा असून आयटीएम कॉलेज पनवेल येथे तो बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. डोकालाम प्रकरणी भूतान मध्ये भारतीय सैन्य घुसवून चीनला मागे जाण्यास भाग पाडणारे, सर्जिकल स्ट्रइक करून पाकिस्तानला सणसणीत चपराक देणारे, लडाखमध्ये चीनला मूह तोड जबाब देणाऱ्या जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण देश शोकसागरात आहे. युवा कलाकार प्रणय देवदत्त पुजारे याने जनरल बिपीन रावत यांचे हुबेहूब पेन्सिल स्केच रेखाटत श्रद्धांजली व्यक्त केली आहे.