*कोकण Express*
*भालचंद्र बाबांच्या जयघोषात दुमदुमली कणकवलीनगरी…!*
*ढोल ताशांचा गजर अन् तुतारीचा आवाज निनादला…!*
*भक्तगण बाबांच्या चरणी झाले नतमस्तक…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिगंबरा दिगंबरा भालचंद्र बाबा दिगंबरा… निघालो घेवून भालचंद्र बाबांची पालखी…असा जयघोष करत विविध धार्मिक कार्यक्रम आणि सायंकाळच्या पालखी मिरवणुकीने योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 44 व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. बाबांच्या जयघोषाने अवघी कणकनगरी दुमदूमून गेली होती. कोरोनाचे नियम पाळत हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत कृपाशिर्वाद घेतले आहे.
असंख्य भाविक भक्तांचे श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 44 वा पुण्यतिथी दिन शुक्रवारी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. या उत्सवानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रम पार पडले. शुक्रवारची पुण्यतिथी दिनाची पहाटही एक आगळी वेगळी पहाट होती. पहाटेच्या काकड आरतीला शेकडोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली. पुण्यतिथी दिन असल्याने बाबांची समाधी तुळशी आणि फुलांनी सजवण्यात आली होती. नित्य समाधी पूजा आणि काकड आरती नंतर भाविकांनी समाधीचे दर्शन रांगेत घेण्यास सुरूवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांचा ओघ सुरूच होता. जपानुष्ठान, भजने झाली. त्यानंतर स.10.30 ते 12.30 या वेळेत समाधीस्थानी श्रींची राजोपचार महापूजा झाली. दुपारच्या महाआरतीलाही भाविकांची मोठी उपस्थिती होती. आरती नंतर भाविकांनी रांगेने खिचडी प्रसाद घेतला. त्यानंतर सायंकाळी 5 वा. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत संस्थान परिसरात भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते. भालचंद्र नामाचा जयघोष अखंडपणे सुरू होता. रात्री 8 वा. दैनंदिन आरती झाली आणि या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली. बाबांच्या या उत्सवामुळे पाच दिवस अवघी कणकनगरी भक्तीरसात न्हावून गेली होती. चार दिवस नामवंत किर्तनकारांच्या किर्तनांचा लाभ भाविकांना घेता आला.