*कोकण Express*
*नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती जोडता येणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत करिता तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करतानाच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक होते. मात्र यात आता शिथिलता देण्यात आली असून, जात वैधता प्रमाणपत्र करिता पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करीन असे हमीपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश 6 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी जारी केला आहे. तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करणे शक्य व्हावे या हेतूने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र करिता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा व विहित नमुन्यातील हमीपत्र 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजे पर्यंत दाखल करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी हा 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर जात वैधता प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा व विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या सूचनेनुसार नामनिर्देशन पत्र दाखल करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.