नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व निवड चाचणी पात्रता फेरीत देवगड ची दिप्ती वारीक प्रथम तर सुरभी ओगले द्वितीय

नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व निवड चाचणी पात्रता फेरीत देवगड ची दिप्ती वारीक प्रथम तर सुरभी ओगले द्वितीय

*कोकण  Express*

*नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व निवड चाचणी पात्रता फेरीत देवगड ची दिप्ती वारीक प्रथम तर सुरभी ओगले द्वितीय*

*कासार्डे ः संजय भोसले*

नेहरू युवा केंद्र संघटन सिंधुदुर्गच्यावतीने अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेसाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी देवगड तालुक्यातून तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली.

केंद्रशासनाच्या नेहरू युवा केंद्र संघटन मार्फत देशभरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तरापासून देशपातळीवर घेण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा युवा अधिकारी श्री. मोहित सैनी तसेच प्रकल्प सहाय्यक सौ. अपेक्षा मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील निवड चाचणी पार पडली. यामध्ये दीप्ती वारीक (मुटाट) – प्रथम,  कु. सुरभी ओगले (दहिबाव) द्वितीय,  यशोधन देवधर (विजयदुर्ग) तृतीय या स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

युवकांनी राष्ट्र निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने नेहरू युवा केंद्र  युवकांसाठी विविध उपक्रम राबवते. चांगल्या नागरिकत्वाची मूल्ये विकसित करणे हा मुख्य उद्देश. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. म्हणजेच सामाजिक बांधिलकी युवकांमध्ये रुजविण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. तालुक्यातील १८ ते २९ वर्ष वयोगटातील युवक युवतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

तालुका ते देशपातळीवर जाणारी ही स्पर्धा हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून अनिवार्य होती. मातृभाषेच्या पलीकडे जाऊन परप्रांतीय हिंदी आणि इंग्रजी भाषेतील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ग्रामीण भागातील स्पर्धकांनी आव्हान स्विकारल्याबद्दल आयोजकांकडून सर्वच स्पर्धकांचे कौतुक होत आहे. असेच सातत्याने नवीन आव्हानांना स्विकारत स्वतः क्रियाशील राहावे आणि राष्ट्र निर्मितीसाठी NYKS च्या उपक्रमांमध्ये खारीचा वाटा उचलावा असे आवाहन देवगड तालुका समन्वयक रीना दुदवडकर यांनी युवकांना केले.

या स्पर्धेसाठी डॉ. वाय्. व्ही. महालिंगे (कणकवली), प्रा. राजेंद्र पवार (फणसगाव), श्री. व्ही. डी. टाकळे (तळेरे) यांनी परीक्षणाचे काम पाहिले. या कार्यक्रमास उपस्थित प्रा. नरेश शेट्ये, तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे सौ. श्रावणी मदभावे तसेच स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होते. देवगड तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये फणसगाव महाविद्यालय, विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, महाविद्यालय कणकवली, पंचम खेमराज लॉ कॉलेज, पोतदार स्कूल या शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सर्व स्पर्धकांना ई- प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या दरम्यान डॉ. महालिंगे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करत NYKS च्या कार्यक्रमांस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्र संघटन, देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव यांनी तर रीना दुदवडकर यांनी प्रास्ताविकासह आभार  मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!