*कोकण Express*
*बँकेची फसवणूक करणारा जरेबंद…!*
*गोवंडी, कणकवली पोलिसांनी हुंबरट येथे अटक…!*
*संशयीत होता 6 वर्षांपासून फरार…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सांगली बँकेच्या शाखेत कर्जासाठी खोटे कागदपत्रे सादर करून ते कर्ज स्वतः न घेता इतरांच्या नावावर वळवत बँकेची 7 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा वर्षांपासून वाँटेड असलेल्या व्यक्तीस गोवंडी पोलिसांनी कणकवली पोलिसांच्या मदतीने हुंबरट येथे जरेबंद केले. अब्दुल शफी काझी (60 रा. हुंबरट) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
2015 साली झालेल्या या गुन्ह्यातील 8 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. संशयीत आरोपी अब्दुल काझी हा मुंबईत कुटंबासह राहत असे. बँकेच्या फसवणूूकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र, आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अब्दुल काझी याने गाव गाठले. तत्पूर्वी त्याने मुंबईत वेगवेगळे 5 पत्ते बदलले होते. तोपर्यंत त्याच्या गावचा पत्ता हाती लागला नव्हता. पोलिसांनी त्याला वाँटेड म्हणून घोषित केले होते. मात्र, अलीकडेच गोवंडी पोलिसांना अब्दुल काझी हा त्याच्या गावी कणकवली तालुक्यातील हुंबरट येथे राहत असल्याचे समजले. त्यानंतर गोवंडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संपत नाळे, हवालदार श्री. नांदेवडेकर, पोलीस कॉन्स्टेबल श्री. तडवी यांचे पथक बुधवारी आरोपीच्या मागावर कणकवलीत आले. कणकवली पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र बाईत आणि गोवंडी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी हुंबरट येथे आरोपी अब्दुल काझी याच्या घरी जाऊन त्याला जेरबंद केले. त्यानंतर सायंकाळी गोवंडी पोलीस आरोपीला घेऊन मुंबईला रवाना झाले. 6 वर्षे फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.