*कोकण Express*
*व्यक्तीने आपल्या अंगी असलेल्या कोणत्याही कला कौशल्याकडे व्यवसाय भिमूखतेने पहावे आणि उद्योजकता निर्माण करावी*
*तळेरे येथे सुनिल तळेकर यांच्या २४व्या स्मृती दिना निमीत्त आकाश कंदिल स्पर्धेचे दिमाखात वितरण*
*कासार्डे ः संजय भोसले*
स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. अनिल नेरूरकर M.D. (अमेरिका) प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिना दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. दिवाळीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली होती.
बाजारातून वस्तू विकत आणून त्यांनी सजावट करण्याऐवजी स्व कलेतून नवनिर्मिती करावी आणि मोकळ्या वेळेत स्वतःमधील कला गुणांनादेखील वाव द्यावा हा उद्देश ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे व्यवसायनिर्मितीच्या अनेक नवसंकल्पना रुजू लागतील. बेरोजगार हातांपेक्षा व्यक्तीने अंगी असलेल्या कोणत्याही कौशल्याला – कलेला व्यवसायाभिमुखतेने पहावे आणि उद्योजकता निर्माण करावी. अशा धरतीवर ही स्पर्धा घेण्यात आली होती. खुल्या गटात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आकाशकंदील बनविण्यासाठी टाकाऊ आणि पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करण्यास सांगण्यात आले. सामाजिक संदेश देणारे विविध कलात्मक नमुने स्पर्धेच्या निमित्ताने संकलित झाले. तळेरे बाजारपेठ येथे या संकलित आकाशकंदिलांचे एकदिवसीय प्रदर्शन ठेवण्यात आले होते. त्यानंतर इच्छुक स्पर्धकांचे आकाशकंदील दिविजा वृद्धाश्रम येथे देऊन तेथील आजोबा आजींची दिवाळी रंगीबेरंगी, प्रकाशमय करण्याचा आनंद स्पर्धक आणि आयोजकांना मिळाला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या परेश विलास कांडर (बावशी) याला रोख रु. १००१ व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक दिक्षा मंगेश सुतार (पियाळी) रोख रक्कम रु. ७०१ व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक सोहम सत्यवान परब (तिवरे) रोख रक्कम रु. ५०१ व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ सिद्धी जगन्नाथ तळेकर (तळेरे) व उत्तेजनार्थ २ सावी वैभव मुद्राळे (कासार्डे) यांना प्रत्येकी रोख रक्कम रु. ३०१ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला माजी सरपंच विनय पावसकर यांनी ही बक्षिसे पुरस्कृत केली तर संपूर्ण स्पर्धेचे व्यवस्थापन श्रावणी कंप्यूटर एज्युकेशन तळेरे यांनी केले. दिवाळीमध्ये झालेल्या या स्पर्धेचे परिक्षण कलाशिक्षक पी. एन. काणेकर यांनी केले.