*कोकण Express*
*जानवली येथे घडलेल्या अपघातात फार्मासिस्टच जागीच मृत्यू…*
*मुंबई-गोवा महामार्गावरची घटना;अपघातानंतर कार चालकाचे पलायन….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अज्ञात कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात जानवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट गजानन केशव शेट्ये रा.जानवली डोंगरेवाडी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जाणवली टीव्ही एस शोरूमच्या समोर घडला. अपघातानंतर अज्ञात कार चालकाने पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात कार चालकाने मागून शेट्ये यांच्या ऍक्टिव्हाला धडक देऊन कारचालक कारसह पसार झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर फेरफटका मारणारे दामोदर आबाजी सावंत ( रा.जानवली, डोंगरेवाडी ) यांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत जानवली सरपंच शुभदा रावराणे, पोलिस पाटील मोहन सावंत,तुकाराम तावडे, आशिष राणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दामोदर सावंत यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स मागवून अपघातग्रस्त शेट्ये याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच शेट्ये यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात कारचालकाने कारसह अपघात स्थळावरून पलायन केले. तरी ती टिव्हीएस शोरूम च्या सीसीटीव्ही मध्ये अपघाताची घटना रेकॉर्ड झाल्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या कारचा शोध मागणी करण्यात येत आहे.