*कोकण Express*
*उपनगराध्यक्षांनी स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा घेण्याचा धंदा बंद करावा…*
*त्या कुठल्या बिल्डरांशी गुप्तगु सुरु आहे याचा लवकरच भांडाफोड*
*नगरसेवक मंदार केणी यांचा इशारा*
*मालवण ः प्रतिनिधी*
स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करण्याचा धंदा उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी बंद करावा. नगरपालिका लेखा शाखेत जाऊन काँट्रॅक्टरच्या चेकची वही तपासण्यापेक्षा विधायक कामांचा पत्रव्यवहार उपनगराध्यक्षांनी तपासावा. सकाळ पासून रात्रीपर्यंत पालिकेत अर्थकारणाचे हिशोब मांडणाऱ्या उपाध्यक्षांच्या विचारांची कुवत त्याप्रमाणेच आहे. सध्या परवानगीसाठी त्यांचे कुठल्या बिल्डरांशी गुप्तगु सुरु आहे याचा लवकरच भांडाफोड करु. असा इशारा नगरसेवक मंदार केणी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांच्यावर केलेल्या टीकेला श्री. केणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, उपनगराध्यक्ष वराडकर यांचे अर्थकारण नगराध्यक्षांनी पूर्णपणे निष्क्रिय केल्याने उपनगराध्यक्ष वैफल्यग्रस्त झाले आहेत. ज्या संस्थेवर आपण टीका करतो त्या संस्थेचे आपणही उपनगराध्यक्ष आहोत याचा त्यांना विसर पडला आहे. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने करण्याची कामे होत नसतील तर ती कशी करून घेण्यात येतील यासाठी प्रशासनाला मदत न करता फक्त राजकीय वक्तव्य करण्यातच उपनगराध्यक्ष धन्यता मानतात. मात्र राजकीय वक्तव्य करताना ते कुठल्या पक्षाचे आहेत हा मोठा प्रश्न आहे. कारण टीका करून आपल्याच पक्षाच्या आरोग्य सभापती पूजा सरकारे यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आणून आपल्याच पक्षाला अडचणीत आणत आहेत हा संशोधनाचा विषय आहे.
आपली एक सहकारी महिला आरोग्य सभापती असताना तिला मदत, सहकार्य करण्याचे सोडून तिच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढण्याचे काम उपनगराध्यक्ष करत आहेत. अग्निशमन नवीन वाहन खरेदी करायचे असल्यास पहिले वाहन आधी निर्लेखित करून नवीन प्रस्ताव पाठवला जातो. त्यानुसार कार्यवाही करून नवीन गाडीसाठी १ कोटी मागणीचा प्रस्ताव आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिफारस घेऊन अग्निशमन विभागास सादर करण्यात आला आहे. सध्या कोरोना संकट काळात सर्वच प्रशासकीय कामकाज निधी वितरण याबाबत निर्णय घेण्यास विलंब झाला असल्याने या कामास उशीर होत आहे. अग्निशमन प्रस्तावाबाबत जर प्रशासनाकडून माहिती घेतली असती तर असे गैरसमज पसरवणारे विधान करण्याची वेळ उपनगराध्यक्ष यांच्यावर आली नसती.
कुठलेही वाहन असले तरी ते काही कारणाने बंद पडू शकते. त्याप्रमाणे सक्शन मशीन वाहन नादुरुस्त झाले आहे. हे वाहन वारंटी कालावधीत असल्याने कंपनीशी पत्रव्यवहार करून दुरुस्तीसाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. दरम्यान, मालवणच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सावंतवाडी येथील खासगी सक्शन गाडी भाडे तत्वावर आणून गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सकाळ पासून रात्री पर्यंत पालिकेत अर्थकारण हिशेब मांडणाऱ्या उपाध्यक्ष यांच्या विचारांची कुवत त्याप्रमाणेच असणार. मालवण नगरपरिषदेमध्ये सध्या पाणीपुरवठा, कचरा, वाहन ठेके हे कुणाच्या आशीर्वादाने चालले आहेत त्याचे आत्मपरीक्षण उपाध्यक्ष यांनी करावे. स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करण्याचा धंदा बंद करावा. लेखा शाखेत जाऊन काँट्रॅक्टरच्या चेकची वही तपासण्यापेक्षा पालिकेच्या विधायक कामाचा पत्रव्यवहार तपासावा. परवानगीसाठी सध्या त्यांचे कुठल्या बिल्डरबरोबर गुप्तगु सुरु आहे हे योग्य वेळी स्पष्ट करूच. नगराध्यक्ष यांना जनतेने निवडून दिले आहे. ते आपल्या कामकाजाचा लेखाजोखा निवडणुकीत जनतेसमोर मांडतील. त्यावेळी जनता त्यांच्या प्रगतीपुस्तकावर बरा वाईट शेरा मारतील. यासाठी उपाध्यक्ष यांच्या सल्ल्याची निश्चित गरज नाही.
सतत प्रसिद्धीत राहण्यासाठी सोयीनुसार भाजप पदाचा आधार घ्यायचा. त्याच पक्षाच्या सभापतीवर आरोप प्रत्यारोप करायचे ही उपनगराध्यक्ष यांची कामगिरी आहे. कारण त्यांचा इतिहास सांगतो की ते ज्या पक्षातून निवडून येतात त्याच पक्षाशी गद्दारी करतात. सध्या भाजपमध्ये राहून कुठल्या पक्षाच्या दिशेने ‘बाण’ मारत आहेत. हे उपनगराध्यक्ष यांनी आधी स्पष्ट करावे. दुसऱ्यांना घोडा मैदान जवळ आहे असा सल्ला देण्यापेक्षा यावेळी निवडणुकीत घोडे बाजार चालणार नाही याचे आत्मपरीक्षण उपनगराध्यक्ष यांनी करावे असेही श्री. केणी यांनी म्हटले आहे.
