*कोकण Express*
*▪️सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लवकर जाहीर होणार…*
*▪️स्थगिती उठली; आठही याचिका न्यायालयाने फेटाळल्याने “मार्ग मोकळा”*
*सिंधुदुर्गनगरी*
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आठही याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
त्यामुळे येत्या सोमवार-मंगळवार पर्यंत जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीतून नाव वगळले असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या आठही याचिका उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काथावाला यांनी फेटाळल्या आहेत. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार जिल्ह्यातील एकूण १ हजार १७७ मतदार सहकारी संस्थांपैकी ९८२ संस्था मतदान करण्यास पात्र ठरल्या होत्या. तर १९५ संस्था मतदानापासून बाहेर गेल्या आहेत. अंतिम मतदार यादी निश्चित करण्यापूर्वी हरकती घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यामुळे ज्या संस्थांनी हरकती दाखल केल्या त्यातील बऱ्याच संस्था जिल्हा बँक निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट झाल्या, तरीही अंतिम मतदार यादीनंतर जिल्ह्यातील १९५ सहकारी संस्था मतदार यादीतून बाहेर पडल्या .
यापैकी आठ संस्थांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया थांबली होती. आठही याचिका फेटाळल्या आहेत.त्यामुळे सोमवारी नव्याने जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.