*कोकण Express*
*▪️कलमठ गावातील वीज समस्या दूर न झाल्यास आंदोलन*
*▪️भाजप युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री यांचा इशारा : महावितरण अभियंत्यांची घेतली भेट..*
कणकवली, ता.२६ :
कणकवली शहरालगत असलेल्या कलमठ गावात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज ट्रान्स्फॉर्मर नादुरूस्त असल्याने अनेक वाड्यांमध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. यात ग्राहकांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या सर्व वीज समस्या दूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री यांनी आज दिला.
श्री.मेस्त्री यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कलमठ गावात तब्बल ४ हजार वीज कनेक्शन आहेत. त्यामुळे शहराप्रमाणेच कलमठ गावातही सेवा दिली जावी अशी मागणी केली. तसेच कलमठ गावात बसविण्यात आलेले नवीन ट्रान्स्फॉर्मर, वीजेच्या कमी दाबामुळे जळलेल्या घरगुती उपकरणांचे पंचनामे करा तसेच कलमठ गाव अर्बनला जोड़ा अशी मागणी केली.
कलमठ गावातील वीज ट्रान्स्फॉर्मर नादुरूस्त असल्याने प्रामुख्याने बौद्धवाड़ी, सुतारवाड़ी मध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. परिणामी त्या भागातील ग्राहकांचे दूरदर्शन संच, पंखे, मॉडेम व इतर वीज उपकरणे जळून नादुरूस्त झाली आहेत. त्या सर्वांचे तातडीने पंचनामे व्हायला हवेत. जेथे वीज ट्रान्स्फॉर्मर नादुरूस्त झाले आहेत तेथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवा. त्यानंतरच या भागात वीज वसूली पथके पाठवा अन्यथा कलमठवासीयांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा श्री.मेस्त्री यांनी दिला.

