*कोकण Express*
*▪️संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो*
*▪️”माझे संविधान ,माझा अभिमान “अंतर्गत कासार्डे विद्यालयात विविध उपक्रमाने संविधान दिन साजरा*
*▪️भारतीय संविधानात डॉ. आंबेडकरांचे योगदान देश कधीच विसरू शकणार नाही*
*कासार्डे ः संजय भोसले*
भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यानी राष्ट्राला अर्पण केलेल्या भारतीय संविधानाला आज ७२ वर्षे पुर्ण होत असून संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन म्हणून हा २६ नोव्हेंबर रोजीचा दिन भारतभर साजरा केला जातो. भारतीय घटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला, त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “माझे संविधान, माझा अभिमान” अंतर्गत संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेतील मूलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत, यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधाना विषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करुन त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मानकरण्याकरीता या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
*विविध उपक्रमांनी असा साजरा झाला संविधान दिन*
“माझे संविधान, माझा अभिमान” या उपक्रमा अंतर्गत कासार्डे विद्यालयात शालेयस्तरावर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची निबंध लेखन, काव्य लेखन, चित्रकला प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य, पोस्टर लेखन, स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यातआले होते. याशिवाय शिक्षकांसाठी फलक लेखन हा उपक्रम घेण्यात आला. या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
२३नोव्हेबंर पासून प्रत्येक दिवशी विद्यालयात संविधान दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज २६ रोजी विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एम. डी. खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे समतादूत विजय कदम, विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका बी. बी. बिसुरे, संजय भोसले, प्रा. रमेश मगदूम, दत्तात्रय मारकड, प्रा. अनिल नलावडे, प्रा. अनिल जमदाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
बार्टी या संस्थेचे समतादूत विजय कदम यानी होम मिनिष्टर पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून सलग प्रश्नांची बरोबर उत्तरे देणार्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत तर कांहींना अंधश्रद्धा समितीचे संस्थापक डाॅ नरेंद्र दाभोळकर यांचे पुस्तक बक्षीस देवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला व एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने सर्वांची मने जिंकून घेतली.
दरम्यान समतादूत विजय कदम व पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांनी भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना विशद करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी दिलेले योगदान देश कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपरिमित कार्यकर्तृत्वाचा विशेष गौरव केला. याप्रसंगी मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. उपस्थितांचे आभार बी. बी. बिसुरे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केल.