*कोकण Express*
*▪️कणकवलीत सिलिका मायनिंग विरोधात महसूल विभागाची धडक कारवाई..*
*▪️चार डंपर घेतले ताब्यात; अनाधिकृत सिलिका मायनिंग व वाळू वाहतुकीवर लावणार लगाम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या आदेशानुसार महसूल विभागाची तालुक्यात धडक कारवाई सुरु झालेली आहे. फोंडाघाट चेक पोस्ट येथे अवैधरीत्या सिलिका मायनिंग व वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूलची धडक मोहीम आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी पकडलेल्या वाळूच्या डंपरवर २ लाख ९६ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अन्य तीन डपंर नव्याने पकडण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती.
मंगळवारी रात्री पडलेल्या अनधिकृत वाळूच्या डंपरवर दोन लाख ९६ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.तर बुधवारी रात्री उशिरा पकडलेल्या तीन डपंरमधील सिलिका व वाळूची मोजमापे घेण्यात आली आहेत. मात्र दंडाची कारवाई उशिरापर्यंत सुरु होती.
महसूल विभागाने चेक पोस्टवर २४ तास पथके तैनात केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून अनधिकृत सिलिका व वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. फोंडाघाट येथे चेकपोस्ट वर कारवाई करण्यात आली,ही कारवाई मंडळ अधिकारी दिलीप पाटील, विद्या जाधव, तलाठी श्री.सलाम लाबर यांनी केली.