अवैध दारू वाहतूक प्रकरणी बारामतीतील एकजण ताब्यात

अवैध दारू वाहतूक प्रकरणी बारामतीतील एकजण ताब्यात

*कोकण Express*

*अवैध दारू वाहतूक प्रकरणी बारामतीतील एकजण ताब्यात*

*सावंतवाडी पोलिसांची वेत्ये येथे कारवाई*

*तीस लाखांच्या दारूसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आयशर टेम्पोवर कारवाई करित एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भानुदास बाळासो चांदगुडे (३२, बालाजीनगर बारामती) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई झाराप-पत्रादेवी महामार्गावर वेत्ये येथे मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास करण्यात आली.
दरम्यान, संशयिताला अटक करून बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. ते म्हणाले, गोवा येथून अवैध दारूची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानुसार आपल्या सहकाऱ्यांसमवेत झाराप-पत्रादेवी महामार्गावर गस्त घालत असताना वेत्ये-तिठा येथे संशयास्पद टेम्पो आढळून आला. यावेळी टेम्पो चालकाची कसून तपासणी केली असता प्रथम आयशर टेम्पोच्या हौड्यातील दर्शनी भागात भूशाने भरलेली पोती आढळून आली. त्यानंतर त्याच्या मागे दारूचे बॉक्स दिसून येताच त्यातून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या चालकासह ३० लाख ५२ हजार ८०० रुपयांची दारू व २० लाखाचा टेम्पो मिळून ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दारूच्या रॉयल व्हिस्कीचे बॉक्स आढळून आले तर ती दारू गोवा येथून गुजरात येथे वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, या मागे मोठे रॅकेट आहे काय याची देखील चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.
ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सचिन कांडरकर, मनीष शिंदे, दर्शन सावंत, मुकुंद सावंत, गुरु नाईक, सतीश कविटकर, महेश जाधव, प्रसाद कदम आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!