*कोकण Express”
*इचलकरंजी संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर*
*आमदार प्रकाश आवडे स्वागताध्यक्ष तर कादंबरीकार सुशील धसकटे प्रमुख पाहुणे*
*12 डिसेंबर रोजी इचलकरंजीत संमेलन*
*संस्कृती प्रतिष्ठान अध्यक्ष महावीर कांबळे आणि सहकाऱ्यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
इचलकरंजी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे इचलकरंजी येथे रविवार 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील नामवंत कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रकाश आवाडे स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाला कादंबरीकार सुशील धसकटे (पुणे) यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे, कार्यवाह अनुराधा काळे, कार्याध्यक्ष पंडित कांबळे आणि सहकाऱ्यांनी दिली. इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात असले तरी या शहराची सांस्कृतिक ओळख स्वतंत्र्य आहे. याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान या शहरात हे संस्कृती साहित्य संमेलन आयोजित केले असून या संमेलनाला कवी आणि कोकण रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदर पत्रकार परिषदेला संस्थेचे पदाधिकारी विभावरी कांबळे, संजय रेंदाळकर, दत्तात्रय लाळगे-पाटील, सुनिल कोकणी आदी उपस्थित होते.
श्री कांबळे आणि सहकारी म्हणाले, परिवर्तन विचारांची बांधिलकी स्वीकारून संस्कृती प्रतिष्ठान काम करत आहे. या पुढे दरवर्षी एका मान्यवर साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली संस्कृती साहित्य संमेलन इचलकरंजी शहरात करण्यात येईल. या वर्षीचे हे संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात संमेलनाचे उदघाटन, संस्कृती काव्य पुरस्कार सोहळा आणि मान्यवरांची भाषणे तर दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. या कविसंमेलनात महाराष्ट्र मधील विविध भागातील कवींना कविता वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष कवी अजय कांडर हे मराठीतील आजचे महत्वचे कवी असून त्यांचे ‘आवानओल’ ‘हत्ती इलो’ आणि ‘युगानुयुगे तूच’ हे तीन कवितासंग्रह बहुचर्चित ठरले आहेत. त्यांच्या आवानओल’ या पहिल्याच कवितासंग्रहाला अमेरिकेतून दिला जाणाऱ्या महाराष्ट्र फाउंडेशन तसेच जैन उद्योग समूहाच्या बालकवी पुरस्काराने, विशाखा, कुसुमाग्रज अशा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गैरविण्यात आले आहे.
कांडर यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू आदी भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाल्या असून महाराष्ट्रातल्या आठ विद्यापीठात आणि एका शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या काव्य लेखनावर एम.फिल.पीएच.डी.चे संशोधनही झाले आहे. देशभरातील विविध बहुभाषिक कविसंमेलनात त्यांना अनेक वेळा कविता वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या साहित्य अकादमीवर (मराठी) त्यांची 2013 ते 2018 या कालावधीत सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांना साहित्य अकादमीची प्रवास फेलोशिप प्राप्त झाली होती. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे निर्मित राजू मुळे दिग्दर्शित ‘बैल- अबोलबाला’ या गाजलेल्या नाटकात त्यांच्या काही कवितांचा समावेश करण्यात आला आहे. तर महाश्वेतादेवी या जागतिक कीर्तीच्या लेखिकेच्या कथेवर संदेश भंडारे दिग्दर्शित ‘महादू’ या चित्रपटाची त्यानी लिहिलेली गाणी लक्षवेधी ठरली असून त्यांचे चित्रपट गीते सुरेश वाडकर, देवकी पंडित, शौनक अभिषेकी, शाहीर संभाजी भगत यांनी गायली आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले कादंबरीकार सुशील धसकटे यांची ‘जोहार’ ही पहिलीच कादंबरी बहुचर्चित झाली असून तरुण वर्गाने या कादंबरी लेखनाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. हर्मिनस प्रकाशनाचे संचालक म्हणून काम करतांना त्यांनी वैचारिक साहित्य प्रसिद्ध करण्याला प्राधान्य दिले. यावर्षी त्यांनी ‘गांधी आणि लोहिया’ हा विषय घेऊन प्रसिद्ध केलेला ‘परंतु’ दिवाळी अंक लक्षवेधी ठरला आहे.