*कोकण Express*
*▪️मालवण पंचायत समितीत लोककलावंतांचा ‘मेळा’*
*▪️लोककला महोत्सवाचे जिप अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते उद्घाटन : पद्मश्री परशुराम गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती*
*मालवण ः प्रतिनिधी*
लोककला जोपासणाऱ्या लोककलावंतांचा सन्मान करण्याचा मालवण पंचायत समितीचा उपक्रम स्तुत्य असाच आहे. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोककलावंतांच्या सन्मानाचे धोरण नेहमीच राहिले आहे. मालवण पंचायत समितीच्या माध्यमातूनही लोककलावंतांना व्यासपीठ उपल्बध करून कलावंतांचा होणारा सन्मान अनोखा असाच आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी मालवण येथे बोलताना केले.
मालवण पंचायत समितीच्या लोककला महोत्सवाचे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटक सोहळ्यास पद्मश्री परशुराम गंगावणे व जेष्ठ दशावतार कलारत्न ओमप्रकाश चव्हाण
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांच्या संकल्पनेतून मालवण पंचायत समितीच्यावतीने २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पंचायत समिती मालवण येथे लोककला महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजु परुळेकर, जिप वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिप सदस्य संतोष साटवीलकर, पस सदस्य अशोक बागवे, मनीषा वराडकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, वृत्त निवेदक ऋषी देसाई, उद्योजक बाबा परब आदी उपस्थित होते. अध्यक्षा संजना सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पंचायत समितीच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
मालवण तालुक्यातील दशावतार, भजन, संगीत व अन्य लोककला क्षेत्रातील कलाकारांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या सन्मान करण्यात आला. काही कलावंत तर सन्मान सोहळ्याने भारावले. काही जेष्ठ कलावंत व्यासपीठावर नतमस्तक झाले.
सभापती अजिंक्य पाताडे यांनी ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लोककला व त्यातील कलाकार यांचा यथोचित सन्मान करण्याच्या दृष्टीने व जुन्या वृद्ध कलाकारांना पुन्हा एकदा रंगमंचावर आपली कला सादर करता यावी यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले.
पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी मला पद्मश्री मिळाल्याने कळसूत्रीच्या निर्जीव बहुल्यांमध्ये सजीवपणा आला आहे. असे सांगत मालवण पंचायत समितीने लोककलाकारांचा सन्मान केल्याने, त्यांना व्यासपीठ मिळवून दिल्याने लोककलांना पुन्हा राजाश्रय मिळाल्यासारखे वाटत आहे, असे सांगत आंनद व्यक्त केला.
ओमप्रकाश चव्हाण यांनी लोककलाकारांना सर्वांचे पाठबळ मिळाल्यास कला उंचीवर पोहचण्यास वेळ लागणार नाही, असे सांगत पंचायत समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, वित व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, वृत्तनिवेदक ऋषी देसाई भजनसम्राट भालचंद्र केळुस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले.
लोककला महोत्सव आयोजनात प्रमुख सहभाग असलेले उपसभापती राजू परुळेकर यांनी उपस्थित कलावंत व मान्यवर यांचे आभार मानले. सुत्रसंचालन कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी केले.
किल्ले सिंधुदुर्ग येथून शिवज्योत
कला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी किल्ले सिंधुदुर्ग येथून शिवज्योत आणण्यात आली. ही शिवज्योत तीन दिवस कार्यक्रमस्थळी तेवत राहणार आहे. प्रवेशद्वारावर असलेले मानवी स्टॅचू आकर्षक ठरत आहेत. हे स्टॅचू सेल्फी पॉईंट ठरत आहेत.