*कोकण Express*
*▪️बांदा ग्रामपंचायतीसाठी अग्निशमन बंब देणार*
*बांदा ः प्रतिनिधी*
खासदार निधीतून बांदा शहर ग्रामपंचायतीसाठी अग्निशमन बंब देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्याची माहिती सरपंच अक्रम खान यांनी दिली. यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने मंत्री राणे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासीक व सर्वात मोठी बाजारपेठ बांदा आहे. बांदा शहराचे विस्तारीकरण हे वेगाने होत आहे. बांदा शहरावर आजूबाजूचे ३० ते ४० गाव अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांत बांदा शहरात व दशक्रोशीत आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. दशक्रोशीतील ग्रामीण भागात देखील अग्निशमन बंबाच्या कमतरतेमुळे कित्येक एकर क्षेत्रातील बागायती जळून खाक झाल्या आहेत. बांदा शहरात देखील मागील काळात आग लागून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी असलेले अग्निशमन बंब हे वेळेत पोहोचत नसल्याने दरवर्षी नुकसानीला सामोरे जावे लागते. यासाठी आपल्या निधीतून बांदा शहरासाठी अग्निशमन बंब उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, उपसभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, श्यामसुंदर मांजरेकर यांनी मंत्री राणे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी राणे यांनी लवकरच आपल्या निधीतून बांदा ग्रामपंचायतसाठी अग्निशमन बंब देण्याचे आश्वासन दिले.