*कोकण Express*
*▪️भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठाणे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली.*
*▪️तळीरामांची जशी काळजी घेता तशी मराठा समाजातील तरुणांचीही घ्या’*
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठाणे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. गेल्या दोन वर्षांपासून चपट्या पायाचे महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्रासाठी पनौती असून त्यांच्या भोंगळ कारभाराचा आढावा घेऊन ते जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे
मराठा आरक्षणाविषयी या सरकारने जनतेची, समाजाची दिशाभूल केली असून फसवणूक केली आहे. जनतेने अपेक्षा कशी ठेवायची असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तीन पक्षाचे सरकार आहे पण तरीही मराठा आरक्षणाबाबत या सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्ट नाही. मराठा समाजाच्या तरुणांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे काम हे सरकार करत आहे. हे खुल्या डोळ्यांनी महाराष्ट्राची जनता पाहत आहे. यांच्या घरात पाणी आले नाही तरी हे लोक केंद्राकडे बोट दाखवतात, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी महाविकास आघाडीने भोसले समितीची स्थापना केली आहे. मात्र, या समितीने आतापर्यंत काय दिवे लावले आहेत हे सरकारने सांगायला हवे. मराठा समजाने हे ओळखायला हवे की, हे सरकार आपल्याला न्याय देऊ शकेल का? असेही नितेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्री हे कधीही बैठका घेत नाहीत कारण त्यांना कारभार कळतच नाही. गावातला सरपंच पण त्यांच्यापेक्षा चांगले काम करू शकतो, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. एकनाथ शिंदेही त्या समितीमध्ये आहेत मग त्यांनी आयोग स्थापनेसाठी का आवाज उठवला नाही असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
आरोग्य विभागातील परीक्षेत झालेल्या घोळावरही नितेश राणे यांनी वक्तव्य केले. आरोग्य विभागाच्याब भरतीमध्ये किती तो गोंधळ आणि या परीक्षेला बसणारे उमेदवार हे प्रामुख्याने मराठा समाजातीलच आहेत मग यांचे भविष्य अंधारात टाकण्याचे काम कोण करत आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. परीक्षा घेणारी कंपनी ही मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांची आहे, यावर सविस्तर अधिवेशनात बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तळीरामांची जशी काळजी घेता तशीच तरुणांची घ्या. यांच मंत्रालय हे आठच्या नंतरच उघडत असणार असा टोलाही त्यांनी लगावला आहे.राणे यांनी म्हटले. अनिल परबांकडून एसटीचे भले होईल ही अपेक्षाच चुकीची, असेही नितेश राणे यांनी एसटी संपाविषयी म्हटले. जनतेने या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे, असेही नितेश राणे म्हणाले.