*कोकण Express*
*▪️वेंगुर्लेत आज पासून भव्य “दीपज्योती नमस्तुते दिव्य दिवाळी उस्तव” : भाजपचे आयोजन*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
दीपावली सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित केलेल्या दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सवाचे उदघाटन आज १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच शैलेंद्रजी दळवी संघटन मंत्री रत्नागिरी – सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सिनेअभीनेते व मालवणी हास्यसम्राट दिगंबर नाईक यांची खास उपस्थिती राहणार आहे.
तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेला हा दिव्य दिवाळी उत्सव वेंगुर्ले कॅम्प येथील नगरपालिकेच्या नव्याने विकसित केलेल्या त्रिवेणी संगम उद्यानात होत आहे. यासाठी खास सजावट करण्यात आली आहे. उदघाट्नप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच वेळी भाजपने आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर दीपावली शो टाईम अंतर्गत “अनिता करावके” हा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दिनांक १३ रोजी “एक दीप प्रकाशाचा” उपक्रमांतर्गत वेंगुर्लेवासियांतर्फे दिपपूजन केले जाणार आहे. त्यानंतर लोकनृत्ये, समई नृत्याचा कार्यक्रम होणार आहे, तर रविवार दिनांक १४ रोजी सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचा “गितझंकार” हा भावगीत, भक्तीगीत, सुगमसंगीताची मेजवानी असणारा कार्यक्रम होणार आहे. तरी रसिकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.