*कोकण Express*
*▪️सोनुर्ली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ गावचे प्रमुख मानकरी राजेंद्र उर्फ राजू गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी देवस्थान कमिटीचे बाळा गावकर ग्रामस्थ उपस्थित होते.
सोनुर्ली श्री देवी माऊली देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. देवी माऊलीची जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. गेली काही वर्ष या मंदिराकडे जाणारा रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरवल्याने रस्ता पूर्णतः खड्डेमय व वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. एकूणच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक भाविक भक्तांकडून याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे रस्त्याची डागडुजी करा असे मागणी ग्रामस्थांकडून होत होती.
या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याला बजेटमधून मंजुरी मिळाली होती. मात्र, कोरोना काळात निधी उपलब्ध नसल्याने या रस्त्याचे काम रेंगाळले होते. याबाबत दोन दिवसापूर्वीच देवस्थान कमिटीच्या माध्यमातून प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची भेट घेण्यात आली होती. यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच खड्डेमय बनलेला रस्ता नूतनीकरण करा, अशी मागणी उपस्थितांनी केली होती. त्याला प्रतिसाद देत संबंधित ठेकेदाराला सदरचे काम तात्काळ सुरू करण्याबाबतच्या सूचना श्रीमती चव्हाण यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.