*कोकण Express*
*▪️कोकण रेल्वेचे शिल्पकार, संसदपटू मधू दंडवते यांचा 16 वा स्मृतिदिन संपन्न*
*▪️कोकण रेल्वेचे शिल्पकार, संसदपटू मधू दंडवते यांचा 16 वा स्मृतिदिन संपन्न*
“सुयोग्य दळणवळण यातूनच विकास साधणे शक्य आहे” हे ओळखूनच कोकणासारख्या मागास भागात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेची उभारणी केली, असे प्रतिपादन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले. त्या कोकण रेल्वे कर्मचारी आणि आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने कणकवली रेल्वे स्टेशन येथे संपन्न झालेल्या मधु दंडवते यांच्या सोळाव्या स्मृतिदिनी बोलत होत्या. कोकण रेल्वेचे अशक्य स्वप्न प्राध्यापक मधु दंडवते यांनी सत्यात उतरवले आणि कोकण विकासाचा मार्ग प्रशस्त केला, असे त्या पुढे म्हणाल्या.
स्वर्गीय मधु दंडवते 1970 – 71 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. 1971 ते 1990 या कालावधीमध्ये दंडवते राजापूर लोकसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा खासदार होते. या दीर्घ कालावधीत त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. 21 जानेवारी, 1924 ते 12 नोव्हेंबर, 2005 ही सुमारे ऐंशी वर्षांची समर्पित जीवनाची कारकीर्द त्यांची होती. तत्व निष्ठेने जगणाऱ्या दंडवते यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा कधीच घेतली नव्हती. सर्वसामान्यांमध्ये ते “नाना” या नावाने परिचित होते. उच्च नैतिकता आणि साधनशुचिता यांचा त्यांनी कायमच आग्रह धरला होता.
कणकवली येथे संपन्न झालेल्या दंडवते यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाला कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, विजय गांवकर, संजय मालंडकर, सादिक कुडाळकर, बाळू मेस्त्री, आबा तेली, ऍड. प्रकाश पावसकर, उमेश वाळके तर कोकण रेल्वेचे पवन जोशी, शिवाजी शिंदे, संजय खरविले, संतोष बापट, प्रशांत सावंत, संतोष कदम, भाई परब, भाऊ चीरेकर, प्रशांत तांबे, संजय पाटील आदी उपस्थित होते.