*कोकण Express*
*▪️मेडिकल कॉलेजच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्रुटींची पूर्तता करा…*
*नियोजनच्या बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच*
*▪️पालकमंत्र्यांनी रात्रीचा जेवणाचा डबाही आणावा*
*▪️आमदार नितेश राणे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राणे केंद्रात मंत्री असल्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज ला परवानगी नाकारल्याचा कांगावा शिवसेनेचे नेते करत आहेत. वस्तुतः केंद्राच्या समितीने अधिकृत प्रोफेसर वर्गातील स्टाफ न भरल्याचे कारण देत परवानगी नाकारली आहे. कोल्हापूर येथील प्रोफेसर डेप्युटशन वर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखविण्यात आले आहेत. मेडिकल कॉलेजच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा खासदार विनायक राऊत यांनी केंद्र कमिटीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी आज केले.
ते म्हणाले, शासकीय मेडिकल कॉलेज हे जनतेचे आहे. स्वतःच्या मालकीचे असल्यासारखे वागू नका. त्रुटींची पूर्तता कशा होतील यासाठी प्रयत्न करा. शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच फायदा होणार आहे. शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती आम्ही देण्यास तयार आहोत.
ते म्हणाले, मेडिकल कॉलेज साठी आमच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्यासोबत जॉईंट मिटिंग घ्यावी. जेणेकरून शासकीय मेडिकल कॉलेज लवकर सुरू होईल. खासदार विनायक राऊत हे दिल्लीत केवळ निवेदनाचे फोटो मीडियाला देण्याशिवाय आणखी काही करू शकत नाहीत.
श्री.राणे म्हणाले, आम्ही आव्हान दिले म्हणून तरी जिल्हा नियोजनची मिटिंग लावली आहे. पण नियोजनची मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात होणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. तसेच पालकमंत्री हे नियोजन बैठकीचे चे मालक नाहीत. जिल्हा नियोजनचा निधी वाटप सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन करणे हे पालकमंत्र्यांचे कर्तव्य आहे. पण या निधी वाटपात पालकमंत्री राजकारण करत आहेत. त्यामुळे नियोजनच्या बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच असा इशारा देत आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्र्यांनी रात्रीचा जेवणाचा डबाही आणावा असा इशाराही दिला.