*कोकण Express*
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत आढावा बैठक ९ रोजी….*
*खासदार विनायक राऊत यांनी दिली माहिती*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
राज्य सरकारने मंजूर केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी कुडाळ तालुक्यातील नेरुर व झाराप येथे पर्यायी जागा पाहण्यात आली असून या जागेबाबत आढावा बैठक.९ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, केंद्र सरकारने पाच शासकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली असून त्यापैकी एक शासकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्य सरकारमुळे मंजूर झाले आहे. मात्र माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांना सध्या विस्मृती होत आहे. त्यामुळे त्यांना या बाबत काहीच माहिती नाही, असा टोला त्यांनी राणे यांना लगावला.
सिंधुदुर्ग येथे मंजुर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकारने सुमारे ५५३ कोटीच्या निधीची तरतूद केली असून या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा नेरुर येथे १७ एकर तर झाराप येथे प्रस्तावित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या २७ एकर जागेत करण्याच्या विचाराबाबत ९ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार असल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.
माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याचा सुपुत्र पालकमंत्री असावा असे सांगितले. पण उदय सामंत हेही जिल्ह्याचेच सुपुत्र आहेत. कारण तेही वेंगुर्ल्याचे आहेत. केसरकर यांचे जे काही संभ्रम असतील ते लवकरच दूर करू, मल्टीस्पेशालीस्ट हाॅस्पीटल सावंतवाडी येथेच करू असेही त्यांनी सांगितले.
