*कोकण Express*
*▪️स्वरांगण संगीत विद्यालयाने दिवीजा आश्रमातील आजी आजोबांना आपल्या स्वरानी न्हाऊ घातले*
*▪️आसलदे येथील दिवीजा आश्रमात रंगली दिवाळी प्रभात*
*कासार्डे ः संजय भोसले*
असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी प्रभात’ या संगीतमय कार्यक्रमाने आजीआजोबांची मने जिंकली. तळेरे येथील स्वरांगण संगीत विद्यालयाच्या शिष्यवर्गाने विविध अभंग, भावगीते, नाट्यगीते सादर करत हा कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम नरक चतुर्दशीला आयोजित करण्यात आला होता.
तळेरे येथील स्वरांगण संगीत विद्यालयाच्यावतीने तळेरे येथे कानसेन कट्टा या उपक्रमांतर्गत संगीत कार्यक्रम आयोजित केला जातो. असलदे येथे आयोजित केलेल्या दिवाळी प्रभात कार्यक्रमा दरम्यान समोर बसलेल्या आजीआजोबांपैकी अनेकजण गाणी गुणगुणत होते. त्यानंतर काही आजोबा आणि आजींनीही गाणी सादर केली. तसेच यावेळी उपस्थित अभिनेत्री प्राजक्ता वाडये हिने एक गाणे सादर केले. त्यामुळे या कार्यक्रमाला आगळीच रंगत आली.
या कार्यक्रमात हर्ष नकाशे, शुभम राणे, संपदा दुखंडे, आदिती लवेकर, सारा शेटये, सायली तांबे, प्रतीक्षा कोयंडे, मृण्मयी पांचाळ आणि स्वरांगण संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. विश्रांती कोयंडे यांनी गाणी सादर केली. पखवाजसाथ अंकित घाडी याने केली. हार्मोनियम साथ सुजय मालंडकर याने तर तबलासाथ सुबोध मालंडकर याने केली.