*कोकण Express*
*कमी केलेल्या दिवाळी सुट्यांची भरपाई होणार !*
*शिक्षक, कर्मचारी यांना दिवाळीच्या कमी केलेल्या सुट्यांची भरपाई करण्याबाबत शिक्षक आमदार “कपिल पाटील” यांच्या पाठपुराव्याला यश*
शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांनी दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्यभर १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी दिवाळीची सुट्टी जाहीर केली गेली होती. परंतु राष्ट्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्याकडून NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी आयोजित होत असल्यामुळे सुट्ट्या कमी करण्यात आल्या. आणि सुट्टीचा कालावधी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा करण्यात आला. परंतु यापूर्वीच केलेल्या नियोजनानुसार २८, २९ आणि ३० ऑक्टोबर या तिन्ही दिवशी परीक्षांचे आयोजन असल्यामुळे बहुतांश शाळा सुरूच होत्या.
आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांना दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त मा. विशाल सोळंकी यांना यासंदर्भात आदेश दिले होते. तसेच आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्त यांच्याशी चर्चा करून कमी झालेल्या सुट्ट्याची भरपाई देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार शिक्षण संचालक (प्राथमिक) मा. दिनकर टेमकर यांनी दिवाळीच्या कमी झालेल्या सुट्ट्यांची भरपाई देण्यात येण्याबाबतचे पत्रक काढले आहे. शाळांना कमी झालेल्या दिवाळी सुट्ट्या या नाताळ किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये ऍडजस्ट करून घ्यावयाच्या आहेत.असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

