*कोकण Express*
*राणेंना जवळ करून भाजपने विषवल्ली पोसून त्याची फळे भाजप भोगू लागला आहे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राणेंना आपल्या पक्षात घेऊन भाजपने विषवल्ली पाेसली आहे. त्याची फळे अाता भाजपला मिळू लागली आहेत अशी टीका शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी आज केली. तसेच गद्दारी, फितुरीची धमकी राणे आपल्या समर्थकांना देत आहेत की मूळ भाजपवाल्यांना असाही सवाल त्यांनी केला.
श्री.रावराणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेबाबत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे खेदजनक म्हणावे लागेल. गेली वीस वर्षे जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच महसूल मंत्री,दुग्धविकास मंत्री, उद्योग मंत्री आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करूनही जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही काहीच केले नाही, याची पोचपावती त्यांच्याच वक्तव्यातून दिसून येते.
ते म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री असताना राणेंनी सिंधुदुर्गात उद्योगधंदे आणले असते, तर आज चित्र वेगळे असले असतं. आजही केंद्रीय उद्योग मंत्री पद मिळाल्यानंतर बेंगलोर येथील व्यावसायिकाला आणून फॅक्टरी सुरू करण्याचे संकेत श्री. राणे देत आहेत. मात्र जिल्ह्यातील उद्योजकांना, नवीन तरुणांना रोजगार, उद्योग देण्याचा त्यांचा कोणताही मानस नाही. जिल्ह्यातील तरुणांना सोबत घेतले तर भागीदारी मिळणार नाही म्हणूनच बाहेरच्या व्यावसायिकांना आणण्याचा घाट ते घालत आहेत.
रावराणे म्हणाले, केरळ, गोवा राज्याने जो विकास केला त्या धर्तीवर तुम्ही सिंधुदुर्गमध्ये काहीच का नाही करू शकला नाहीत? तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी क्वायरबोर्ड चांदा ते बांदा यासारख्या योजना आणल्या, पण त्याला विरोध करून त्या हाणून पाडण्याचे काम राणे यांनीच केले. गेल्या दहा वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, विद्यमान पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय जिल्ह्यात पाय रोवत आहेत. बांबू वरील प्रक्रिया उद्योग, काजू प्रक्रियासाठी विविध योजना, काथा व्यवसाय अशा अनेक व्यवसायांसाठी उद्योजकांना साथ देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र गेली दहा वर्षे राजकारणाच्या साईड ट्रॅकवर पडलेल्या नारायण राणे यांना याबाबत बहुदा कल्पना नसावी असे त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसून येते.
रावराणे म्हणाले, भाजपाच्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन राणे कार्यकर्त्यांना धमकी देवू लागले आहेत. भाजपने पोसलेली ही विषवल्ली भाजपचा गळा आवळणार हे त्यांच्या आचरणातून सिद्ध होत आहे. जिल्ह्यातीलच भाजप कार्यकर्त्यांना लाठ्याकाठ्याची धमकी देणे म्हणजे यांची काय मानसिकता आहे ते दिसून येते. केंद्रीय उद्योग मंत्रीपदी असलेल्या श्री राणे यांनी जिल्ह्यातील तरुण बेरोजगारांना उद्योग धंद्यात कसं आणता येईल त्यासाठी अनुदान योजना व काय करता येईल याबाबत वक्तव्य करून तसे काम करण्याची गरज आहे. मात्र राणे हे आता कार्यकर्ते जनतेला धमकावत आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला भात आणि मासे खाणार अशी टीका करणार्या श्री. राणे यांनी आज पर्यंत काय खाल्ले? केवळ दिल्लीला गेल्यानंतर डबल रोटी व पराठ्याची एवढी आवड त्यांना लागली का? की आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते जनतेसोबत प्रमुख अन्न असलेल्या भात व मासे हेही त्यांना नावडते वाटू लागले असा सवालही रावराणे यांनी केला आहे.

