*कोकण Express*
*मनसे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून समुद्रकिनार्यांची स्वच्छतेचा राबवणार उपक्रम*
*माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून मनसेतर्फे मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनार्यांची स्वच्छता केली जाणार आहे. त्यानुसार 11 नोव्हेंबरला सिंधुदुर्गातील समुद्रकिनार्यांची स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. अशी माहिती मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. किनार्यावरील पर्यावरणाला घातक असलेल्या प्रदुषणकारी वस्तू, प्लॅस्टीक बाटल्या, खाद्यपदार्थांची आवरणे आदी कचर्याची स्वच्छता केली जाणार आहे. मनसेचा जरी हा उपक्रम असला तरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था यांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपरकर यांनी केले आहे.
कणकवलीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, या स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी 21 रोजी मुंबईत मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्यांची बैठक झाली. त्यानुसार पक्षाच्या पर्यावरण समितीच्या प्रतिनिधीनी नुकतीच जिल्ह्यातील समुद्रकिनार्याची पाहणी केली. इतर भागापेक्षा सिंधुदुर्गातील समुद्र किनारे स्वच्छ आहेत. तरीही काही किनार्यांची स्वच्छता मनसेतर्फे 11 नोव्हेंबरला केली जाणार आहे. विशेषत: मालवण, वेंगुर्ले किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक असतात. समुद्र किनार्यावर आलेले पर्यटक पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्य पदार्थांची आवरणे त्याच ठिकाणी टाकतात. हा केरकचरा समुद्र पर्यावरणासाठी घातक असतो. त्यामुळे या सर्व कचर्याचे संकलन केले जाणार आहे. या उपक्रमामध्ये सर्व सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, तरूण, ग्रामस्थ यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले.