*कोकण
*फोंडाघाट ग्रामपंचायत व पोलीसांची संयुक्त मास्क मोहीम ; विनामास्कवाल्यांची तारांबळ*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
गेले सहा महिने शासन, ग्रामपंचायत, व्यापारी संघ, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, विविध पातळ्यांवर covid-19 बाबत जनजागृती करत असताना देखील फोंडाघाट बाजारपेठ, मासे मार्केट इत्यादी ठिकाणी मास्क, सुरक्षीत अंतर, गर्दि टाळणे,सॅनिटायझर इत्यादींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे नेहमी दिसत होते. प्रसंगी वादाच्या घटनाही घडल्या. उठाबशा काढायलाही लावल्या. परंतु जनसामान्यांनी याकडे दुर्लक्ष करताना “बिगिन-अगेन”बिनदिक्कत सुरु केलं.
गेल्या दोन दिवसात आणि सुमारे २१/२२ दिवसांच्या खंडानंतर फोंडाघाट 7-8 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.अन् प्रशासन खडबडून जागे झाले. शिथिलता आल्याने बंदोबस्त, अतिवृष्टीचे पंचनामे इत्यादी प्रशासकीय कामकाजात मग्न असलेली ग्राम- दक्षता समिती सक्रिय झाली.आणि मास्क-विना घराबाहेर पडणाऱ्यावर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये पो. हेडकॉन्स्टेबल एम्.बी.देऊलकर,पो. कॉन्स्टेबल एस्.व्ही.सोंसुरकर, ग्रा.पं लेखनीक जोईल सहभागी झाले. त्यांनी सुमारे 28 हजार रुपये दंड सकाळच्या सत्रात जमा केला. या मोहिमेला सरपंच संतोष आग्रे, ग्रामविस्तार अधिकारी चौलकर यांनी सहकार्य केले. या मोहिमेमुळे विना-मास्क फिरणार्यांची तारांबळ उडाली. मात्र कारवाई पथक एस.टी. स्टँड समोर आणि गांधी चौकात एकाच वेळी कार्यरत रहावे आणि वाहनचालक प्रवासी तसेच दुकानांमध्ये सुरक्षित अंतर न राखणाऱ्यावरही दंडात्मक कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
दिवाळी सण आणि हिवाळा तोंडावर आला असताना प्रत्येकाने कोरोनाविषयक मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे,, गर्दी टाळणे,हात वारंवार धुणे सॅनिटायझरचा वापर इत्यादी बंधने आपण होऊन पाळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा बिगिन अगेन ऐवजी सर्वांना ऐन सणांमध्ये कंटेनमेंट-झोनला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अर्थात यासाठी सतर्क असलेली ग्राम दक्षता समिती कठोर होण्याची गरज व्यक्त होतआहे. यासाठी पं.स.सदस्य व जि.प. सदस्यांचे याकडील लक्ष महत्वाचे ठरणार आहे