*कोकण Express*
*कविवर्य आ.सो.शेवरे यांचे स्मारक कोर्ले येथे उभारणार*
*कोर्ले ग्रामस्थ आणि सरपंच यांचा एक मुखी निर्णय*
*आ.सो.शेवरे साहित्य जागरला जिल्ह्याभरातून प्रतिसाद*
*कणकवली/प्रतिनिधीी*
कोकणच्या परिवर्तन चळवळीतील अग्रगण्य कवी आ.सो. शेवरे यांचे स्मारक त्यांच्या कोर्ले गावी उभारण्यात येईल अशी घोषणा कोर्ले ग्रामस्थ आणि गावचे सरपंच यांनी एक मुखाने केली.कोर्ले येथे एस. के. फाउंडेशन आणि कोर्ले ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य आ.सो. शेवरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सदर घोषणा करताना दरवर्षी कोर्ले येथे शेवरे साहित्य जागर आयोजित करण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला.
कोर्ले येथे एस.के. फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन कोर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शेवरे यांच्या पत्नी मायावती शेवरे, सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग विद्रीही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रा. सोमनाथ कदम, दर्पणचे माजी अध्यक्ष तथा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम, प्रा.अच्युत देसाई, विनायक सापळे, बौ. से.संघ खारे. विभागचे माजी सचिव संतोष पाटणकर आदी उपस्थित होते.यावेळी पुणे येथील कवी देवा झिंजाड यांना मायावती शेवरे यांच्या हस्ते 2021 चा कविवर्य शेवरे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोर्लेकर म्हणाले, संपूर्ण कोकणच्या परिवर्तन चळवळीमध्ये कवी आ.सो. शेवरे यांचे महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेके लिहिते लेखक-कवी पुढे गेले. आज या सर्व पार्श्वभूमीवर शेवरे यांची उचित आठवण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी त्यांच्या कोर्ले गावी त्यांचे उचित स्मारक व्हावे असे मला मनोमन वाटते. यासाठी सरपंच विश्वनाथ खानविलकर यांनी हे स्मारक पुढील वर्षभरात पूर्ण आपण करू अशी ग्वाही दिली, याबद्दल गावच्या वतीने मी त्यांचे ऋण व्यक्त करतो.
सरपंच खानविलकर म्हणाले, मी आज जरी गावचा सरपंच असलो तरी आ. सो. शेवरे यांच्यामुळे मी घडलो. त्यांनी माझ्यासारख्या अनेक उमद्या लोकांना प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिले. शेवरे यांचं नाव महाराष्ट्राभर गेले. त्यामुळे कोर्ले गावाचे नाव सर्व दूर झाले.यामुळे येथे घोषित आम्ही केलेलं त्यांचे स्मारक पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द मी देतो.
श्री मातोंडकर म्हणाले शेवरे यांचे नाव घेतल्याशिवाय कोकणची परिवर्तन चळवळ पूर्ण होऊ शकणार नाही. आम्ही सगळे लोक त्यांच्यामुळेच लिहायला लागलो. आज त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा येथे केली गेली. याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. या स्मारकासाठी लागणारे सहकार्य देण्याची ग्वाही देतो. सचिन कोर्लेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आता शेवरे साहित्य जागर शेवरे यांच्या मूळ गावी होणार आहे. ही चांगली घटना आहे.
प्रा. कदम म्हणाले, समाजामध्ये पद, प्रतिष्ठा,पत व श्रीमंती याही पेक्षा पुस्तकातील विचार व त्या व्यक्तीने लिहिलेली पुस्तकेच माणसाला अनंत काळ समाजामध्ये जिवंत ठेवत असतात.शेवरे यांचे असे योगदान महत्वाचे आहे.
किशोर कदम म्हणाले, तब्बल चाळीस वर्ष शेवरे यांनी निष्ठेने कविता लिहिली.त्यांची ही निष्ठा आत्मसात करणे म्हणजेच शेवरे यांच्या स्मृती जपणे होय!
सूत्रसंचालन व आभार संतोष पाटणकर यांनी मानले.